तुडवायला नाही, तर शिवसेना वाढवायला एकत्र; ठाकरेंच्या ६ खासदारांचा शिंदे सेनेत प्रवेश, विश्वासाला तडा जाऊ देणार नाही - एकनाथ शिंदे  (Photo-X/@mieknathshinde)
मुंबई

तुडवायला नाही, तर शिवसेना वाढवायला एकत्र; ठाकरेंच्या ६ खासदारांचा शिंदे सेनेत प्रवेश, विश्वासाला तडा जाऊ देणार नाही - एकनाथ शिंदे

‘शिवसेनेच्या परिवारामध्ये सहा नवीन खासदार सामील झाले असून त्यांचा योग्य तो सन्मान केला जाईल.

Swapnil S

मुंबई : ‘शिवसेनेच्या परिवारामध्ये सहा नवीन खासदार सामील झाले असून त्यांचा योग्य तो सन्मान केला जाईल. त्यांच्याकडे कधीही दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घेतली जाईल’, असा विश्वास शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी पक्षप्रवेशकर्त्यांना येथे दिला. आम्ही कोणाला तुडवायला नाही, तर शिवसेना वाढवायला एकत्र आलो आहोत असे सांगतानाच शिंदे यांनी खासदारांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नसल्याची ग्वाही दिली. तसेच हे सर्व खासदार २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरच निवडणूक लढवतील, असेही त्यांनी जाहीर केले.

उबाठाच्या ६ फुटीर खासदारांनी सोमवारी येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, नागेश पाटील आष्टीकर, संजय जाधव, संजय दिना पाटील आणि संजय देशमुख हे उपस्थित होते. प्रवेशावेळी शिंदे यांनी या सहाही जणांना त्यांच्या मतदारसंघातील विकास कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यावेळी शिंदे गटाचे अन्य आमदार, मंत्री आणि खासदार उपस्थित होते.

‘ऑपरेशन टायगर’ फुलप्रूफ सक्सेस...

चार वर्षांपूर्वी आपण शिवसेना वाचवण्यासाठी, धनुष्यबाण वाचवण्यासाठी उठाव केला. आता हा लढा दुसऱ्या टप्प्यात पोहोचला आहे. अनेकांनी या सहा खासदारांवर आरोप केले. ते पक्ष सोडून जाणार असल्याचे सांगत उलटसुलट चर्चा झाल्या. पण ते स्वार्थासाठी शिवसेनेत आलेले नाहीत. त्यांची मतदारसंघांमधील कामे, प्रकल्प मार्गी लागावेत यासाठी त्यांनी शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतला. यापुढे मी आणि शिवसेना कायम त्यांच्याशी पाठीशी असेल. शिवसेना हा शब्दाला जागणारा पक्ष आहे. त्यामुळे केंद्राशी निगडित प्रश्न असतील वा राज्यातील प्रश्न तुमची कुठेही अडवणूक होणार नाही, असा शब्द शिंदे यांनी दिला. ही सगळी ताकद एकत्र आल्यानंतर आपली शिवसेना अधिक भक्कम होईल. ‘ऑपरेशन टायगर’ आता फुलप्रूफ सक्सेस झाले आहे. यासंबंधित सर्व कायदेशीर गोष्टी आम्ही केल्या आहेत, अशी माहितीही शिंदे यांनी दिली.

बाळासाहेबांची विचारधारा सोडल्याने उठाव केला...

राज्यात २०२२ साली बाळासाहेबांची विचारधारा सोडून दुसरा विचार आला त्यावेळी आम्ही उठाव केला. त्यावेळी आपल्यासोबत आलेले ४० आमदार परत निवडून येणार नाहीत, असे म्हटले जायचे. परंतु ४० चे ६० आमदार निवडून आले. चांदा ते बांदापर्यंत शिवसेना मोठी झाली. आमची नीती स्पष्ट होती, विचारधारेला घेऊन आम्ही पुढे गेलो. आता आपल्या या कामात सहा खासदार सामील झाले आहेत. या सहा लोकांची ताकद, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमुळे शिवसेना आणखी बळकट होतील, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

पक्षात आता ट्रिपल संजय सहभागी

कट्टर शिवसैनिक खऱ्या शिवसेनेत सहभागी झाले याचा आनंद होत आहे. आमच्या पक्षात आता ट्रिपल संजय सहभागी झाले आहेत. त्यांच्यापुढे बाकीच्या संजयची काय गिनती असे म्हणत शिंदे यांनी उबाठाचे खासदार संजय राऊत यांना टोला लगावला. पण आपल्या पक्षात आणखीही संजय (संजय राठोड) आहेत हे लक्षात येताच त्यांच्यासाठी माझे विधान नव्हते, असा खुलासा शिंदे यांनी केला.

ठाकरेंच्या बैठकीत चार आमदारांच्या गैरहजेरीची चर्चा; खासदार फुटीवर चर्चा नाही, सरकारला जाब विचारण्याचा सल्ला

पुरवणी मागण्यांचा विक्रम; ९७ हजार ७०६ कोटींची तरतूद, शेतकरी कर्जमुक्तीसाठी २० हजार ५५२ कोटी

Mumbai : ‘ओसी’ नसलेल्या इमारतींना दिलासा; ८०० चौरस फुटांपर्यंत सदनिका असलेल्या इमारतींना मिळणार OC, राज्य सरकारची मंजुरी

विधान परिषद निवडणुकीत मतांची फाटाफूट; महायुतीचे निर्विवाद वर्चस्व, महाविकास आघाडीचा धुव्वा

Monsoon Update : अखेर राज्यात मान्सून सक्रिय; येत्या ४८ तासांत मुंबईत मान्सून दाखल होणार, हवामान खात्याची माहिती