गेल्या काही दिवसांपासून सरकारी कर्मचारी हे जुन्या पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी बेमुदत संपावर आहेत. एकीकडे याचा फटका हा रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना बसत आहेत, तर दुसरीकडे अनेक शिक्षक संघटनांचा यामध्ये सहभाग असल्यामुळे विद्यार्थ्यांना चांगलाच फटका बसत आहे. यामुळे आता दहावी बारावीचे निकाल लांबणीवर जाणार असल्याची शक्यता आहे. कारण या संपामुळे तब्बल ७५ लाख उत्तरपत्रिका पडून राहणार असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दहावी बारावीचे निकाल आठवडाभर पुढे जाण्याची शक्यता आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी शिक्षक संघटनांनीही बेमुदत संपाची हाक दिलेली आहे. या काळात उत्तरपत्रिका न तपासण्याचा शिक्षक संघटनांनी पवित्रा घेतला असून बारावीच्या परीक्षा संपत आल्या आहेत. तर, दहावीचे आणखी ३ पेपर बाकी आहेत. त्यामुळे आता राज्य शासन यासंदर्भात पुढे काय निर्णय घेते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.