मुंबई : मधुर आणि सुश्राव्य आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे रविवारी मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. त्या ८९ वर्षांच्या होत्या. त्यांनी मराठी भावगीत, भक्तिगीतांबरोबरच हिंदी चित्रपट संगीतातही मोठे योगदान दिले. दरम्यान, कला क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल केंद्र सरकारने २०२३ साली त्यांना 'पद्मभूषण' या नागरी पुरस्काराने सन्मानित केले होते. सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एक अथांग आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना संगीत क्षेत्रातील दिग्गजांनी व्यक्त केली आहे.
सुमन कल्याणपूर यांचा जन्म २८ जानेवारी १९३७ रोजी बांगलादेशातील भवानीपूर येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना संगीताची आवड होती. त्यांनी संगीताचा अतिशय कसून आणि सखोल अभ्यास केला होता. सुमनजींचे माहेरचे आडनाव हेमाडी होते. त्यामुळे लग्नापूर्वी त्या सिनेसृष्टीत सुमन हेमाडी या नावानेच गाणी गात असत आणि याच नावाने त्यांची सुरुवातीची गाणी लोकप्रिय झाली.
त्यांच्या संगीताच्या प्रवासाची सुरुवात गझलसम्राट तलत महमूद यांच्यामुळे झाली. एका जाहीर कार्यक्रमात गाणे गात असताना तलत महमूद यांनी सुमनताईंचा दैवी आवाज ऐकला. त्या आवाजाने प्रभावित होऊन तलत महमूद यांनी स्वतःच्या एका आगामी चित्रपटासाठी सुमनताईंना गाण्याची विचारणा केली. सुमनताईंनीही होकार दिला आणि तिथूनच त्यांचा चित्रपटसृष्टीतील यशस्वी प्रवास सुरू झाला. दरम्यान, मराठी भावगीत गायनाची त्यांची सुरुवात ग. दि. माडगुळकर यांच्या अजरामर गीतांनी झाली.
लोकप्रिय चित्रपट गीते
जिथे सागरा धरणी मिळते, घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात, निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई, कशी गवळण राधा बावरली, नाविका रे वारा वाहे रे, केतकीच्या बनी तेथे नाजला ग मोर, उठा उठा चिऊताई, या लाडक्या मुलांना यो.
गाजलेली भावगीते आणि भक्तीगीते
अक्रुरा नको नेऊ माधवा, आकाश पांघरुनी, केतकीच्या बनी तिथे, केशवा माधवा, जुळल्या सुरेल तारा, जेथे जातो तेथे, नकळत सारे घडले, वाट इथे स्वप्नातिल, शब्द शब्द जपुनि ठेव.