मुंबई : मुंबईकरांची तहान भागविणाऱ्या तानसा धरणाच्या सुरक्षेसाठी आता मुंबई महापालिका प्रशासनाने पावले उचलली आहेत. धरण परिसरातील वर्कशॉप आणि फिल्टर प्लांटमधून ट्रान्सफॉर्मर तसेच वेल्डिंग केबलची चोरी झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर धरण परिसरात अतिरिक्त सीसीटीव्ही निगराणी यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी महापालिका तब्बल ५२ लाख ३४ हजार ४५२ रुपये खर्च करणार आहे.
मुंबई शहराला दररोज सुमारे ४१०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा विविध जलस्रोतांमधून केला जातो. त्यामध्ये तानसा धरणाचा महत्त्वाचा वाटा असून, या धरणातून दररोज सुमारे ४५० दशलक्ष लिटर पाणी मुंबईकरांना मिळते. त्यामुळे मुंबईचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने तानसा धरणाचे संचालन आणि देखभाल अत्यंत महत्त्वाची आहे. त्या दृष्टीने मुंबई महापालिकेकडून कार्यवाही करण्यात येत आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत
सध्या धरणाचे प्रवेशद्वार, तानसा यार्ड, स्काडा कक्ष, आऊटलेट विहीर आणि स्पिलवेच्या काही भागांत सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत आहे. मात्र, धरणातील काही महत्त्वाची संयंत्रे आणि परिसर या निगराणीच्या कक्षेबाहेर आहेत. याचाच फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी वर्कशॉप आणि फिल्टर प्लांट परिसरातून ट्रान्सफॉर्मर व वेल्डिंग केबल चोरल्या. वर्कशॉपजवळ सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने चोरट्यांचा शोध घेण्यात अडचणी निर्माण झाल्या.
अतिरिक्त यंत्रणा उभारणार
या पार्श्वभूमीवर, नगरबाह्य विभागातील तानसा धरणावर अतिरिक्त सीसीटीव्ही निगराणी यंत्रणा उभारण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामात यंत्रणेची रचना, पुरवठा, स्थापना, चाचणी आणि प्रत्यक्ष कार्यान्वयनाचा समावेश आहे. त्यानुसार पालिका प्रशासन योग्य ती कार्यवाही करणार आहे.
असे आहे धरण
तानसा धरण १८९२ मध्ये कार्यान्वित झालेले दगडी धरण आहे. मुंबईपासून सुमारे ९० किलोमीटर अंतरावर घनदाट जंगल परिसरात हे धरण वसले आहे. धरण परिसरात निरीक्षण बंगला, मोडक बंगला, अभियंत्यांची कार्यालये, दवाखाना, सुरक्षा चौकी, वायरलेस नियंत्रण कक्ष, भांडार कक्ष, आऊटलेट विहीर, लघु जलविद्युत प्रकल्प आणि कार्यशाळा अशा विविध महत्त्वाच्या सुविधा आहेत.