एक्स @ians_india
मुंबई

मुंबई मॅरेथॉनमध्ये यंदा नवे विजेते; इरिट्रियाच्या टेस्फायला जेतेपद, महिलांत केनियाची जॉइस अव्वल

टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये यंदा नवे विजेते पाहायला मिळाले. इरिट्रियाच्या बेहाने टेस्फाय याने पुरुष गटाचे, तर केनियाच्या जॉइस चेपकेमोई टेलेने महिला गटाचे विजेतेपद पटकावले.

Swapnil S

मुंबई : टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये यंदा नवे विजेते पाहायला मिळाले. इरिट्रियाच्या बेहाने टेस्फाय याने पुरुष गटाचे, तर केनियाच्या जॉइस चेपकेमोई टेलेने महिला गटाचे विजेतेपद पटकावले. ३८ वर्षीय टेस्फायने २ तास ११ मिनिटे आणि ४४ सेकंदांत निर्धारित ४२.१९५ किलोमीटर अंतर पूर्ण करून पहिल्यावहिल्या आंतरराष्ट्रीय फुल मॅरेथॉनचे जेतेपद जिंकले.

इरिट्रिया या छोट्या आफ्रिकन देशाने पुरुषांच्या गटात वर्चस्व गाजवले. पहिले दोन्ही क्रमांक त्यांच्याच देशातील धावपटूंनी पटकावले. इरिट्रियाच्या मेरहावी केसेटे याने २:११:५० वेळेसह दुसरे स्थान मिळवले, तर इथिओपियाच्या टेस्फाय डेमेकेने २:११:५६ वेळ नोंदवत तिसऱ्या स्थानावर नाव कोरले.

केनियाच्या २९ वर्षीय टेलेने २:२४:५६ वेळेसह महिलांच्या शर्यतीत अव्वल स्थान पटकावले. तिने बहरीनच्या शिताये इशेते (२:२५:२९) आणि इथिओपियाच्या मेडिना डेमे आर्मिनो (२:२७:५८) यांना मागे टाकत विजेतेपद उंचावले.

पुरुषांत २०२३ मध्ये विजेतेपद जिंकलेल्या इथिओपियाच्या लेमी बर्हानूची हॅटट्रिक हुकली. त्याला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. टेस्फायने शर्यतीच्या शेवटच्या ३ किलोमीटरमध्ये आघाडी घेतली. केनियाच्या फिलेमॉन रोनो (चौथे) आणि बर्हानू यांनी सुरुवातीला आघाडी घेतली होती. पण नंतर त्यांना तो वेग राखता आला नाही. टेस्फायने यापूर्वी सर्वोत्तम प्रदर्शन २०२३ मध्ये स्लोव्हाकियातील कोसिस पीस मॅरेथॉनमध्ये केले होते. त्यावेळी त्याने तिसरे स्थान पटकावले होते. महिलांमध्ये टेलेने सलग दुसरी स्पर्धा जिंकली. तिने ऑक्टोबर २०२३ मध्ये स्लोव्हेनियातील एनएलबी ल्युब्लियाना मॅरेथॉनमध्ये २:२०:१७ वेळेसह विजय मिळवला होता.

भारतीयांत अनिश, निर्माबेन अव्वल

भारतीयांमध्ये अनिश थापाने (२:१७:२३) पुरुष विभागात पहिले स्थान मिळवले, तर निर्माबेन ठाकरने (२:५०:०६) महिलांमध्ये जेतेपद कायम राखले. मन सिंगने २:१७:३७ वेळ नोंदवत भारतीय पुरुषांमध्ये दुसरे स्थान मिळवले, तर दोन वेळा विजेता गोपी टी २:१९:५९ वेळेसह तिसऱ्या स्थानावर राहिला. श्रीनू बुगाथा (२:२०:४३) पाचव्या स्थानावर राहिला. भारतीय महिलांमध्ये सोनिका परमारने (२:५०:५५) दुसरे स्थान पटकावले. तर सोनम (२:५५:४५) तिसऱ्या स्थानावर राहिली. सावन बर्वाल आणि स्टँझिन डोलकर यांनी अनुक्रमे पुरुष आणि महिलांच्या अर्ध मॅरेथॉन गटात विजय मिळवला.

वेगे वेगे धावू...

सध्या मुंबईत तापमानाचा पारा घसरला असून पहाटेच्या वेळी त्यात अधिक घट होते. मात्र तरीही रविवारी मुंबई मॅरेथॉनच्या निमित्ताने मुंबईकरांचा उत्साह पाहायला मिळाला. रेल्वेतर्फे जादा लोकल फेऱ्या सोडण्यात आल्या होत्या. मुंबईकरांनी त्याला पसंती देत पहाटे चार वाजल्यापासूनच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात गर्दी केली होती. यावेळी तरुणाईचा उत्साह, ज्येष्ठ नागरिकांची जिद्द आणि दिव्यांगांची प्रेरणादायी धाव मुंबईच्या रस्त्यांवर पाहायला मिळत आहे. महिला वर्गही यात मागे नव्हता.

न.मुं.म.पा. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचा यशस्वी सहभाग

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी मुंबई मॅरेथॉनमध्ये सलग दहाव्या वर्षी सहभागी होत रविवारी ४२.१९५ किलोमीटरचे मुख्य मॅरेथॉनचे अंतर ४ तास २९ मिनिटे १२ सेकंदांत यशस्वीरीत्या पूर्ण केले. पहाटे ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून प्रारंभ झालेल्या मुंबई मॅरेथॉनमध्ये ६ मिनिटे २३ सेकंद प्रति किलोमीटर वेगाने धाव घेत डॉ. कैलास शिंदे यांनी मुंबई मॅरेथॉन यशस्वीरीत्या पूर्ण केली. जून महिन्यात त्यांनी जागतिक स्तरावरील मानाच्या दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये ८६.६ किलोमीटर अंतर निर्धारित वेळेच्या आधीच ११ तास १० मिनिटे ५६ सेकंदांत पूर्ण केले होते. प्रशासकीय जबाबदारी व व्यस्त दिनक्रम असूनही त्यांनी कधीच धावण्याच्या सरावात खंड पडू दिला नाही.

शर्यतीचा पहिला टप्पा चांगल्या पद्धतीने गेला. मी स्थिर गतीने पुढे जाण्यावर लक्ष केंद्रित केले. २५ किलोमीटरनंतर मी वेळेऐवजी विजयावर लक्ष केंद्रित केले. हा विजय माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.

- बेहाने टेस्फाय, इरिट्रिया

मी फक्त शर्यत जिंकण्यासाठी इथे आले होते. कोणत्याही विक्रमाचा विचार नव्हता.

- जॉइस चेपकेमोई, केनिया

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक