मुंबई

टाटा सन्सची सोमवारी बैठक; चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीला कोर्टाची स्थगिती नाही

टाटा सन्सचे कार्यकारी अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या तिसऱ्या पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी झालेल्या पुनर्नियुक्तीला आव्हान देणाऱ्या टाटा ट्रस्टच्या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी तातडीचा दिलासा देण्यास नकार दिला. त्यामुळे टाटा सन्सच्या ३० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

Swapnil S

मुंबई : टाटा सन्सचे कार्यकारी अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या तिसऱ्या पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी झालेल्या पुनर्नियुक्तीला आव्हान देणाऱ्या टाटा ट्रस्टच्या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी तातडीचा दिलासा देण्यास नकार दिला. त्यामुळे टाटा सन्सच्या ३० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, बैठकीत घेतलेले निर्णय न्यायालयाच्या अंतिम आदेशांच्या अधीन राहतील, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

न्या. अभय आहुजा यांच्या एकल खंडपीठाने बैठक नियोजित वेळेनुसार घेण्याचे निर्देश दिले आहेत. बैठकीला स्थगिती देणे, ती पुढे ढकलणे किंवा चंद्रशेखरन यांना कार्यकारी अध्यक्ष म्हणून मतदानाचा अधिकार वापरू देण्यास मनाई करणे, अशा मागण्या टाटा ट्रस्ट्सने केल्या होत्या. मात्र, शुक्रवारी कोणताही अंतरिम दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला.

प्रतिज्ञापत्र दाखल करा

टाटा सन्सच्या संचालक मंडळाने १७ सप्टेंबर रोजी चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीचा ठराव मंजूर केला होता. मात्र, कंपनीच्या घटनेतील कलम १२१ नुसार आवश्यक असलेले अनुकूल मतदान मिळाले नसल्याने हा ठराव अवैध असल्याचा दावा ट्रस्ट्सनी केला आहे. ३० नोव्हेंबरच्या बैठकीत नामनिर्देशित संचालकांमध्ये मतभेद झाल्यास टाटा सन्सच्या अध्यक्षांना निर्णायक मताचा अधिकार वापरण्यापासून रोखण्याची मागणीही ट्रस्ट्सनी केली होती. न्यायालयाने टाटा सन्स आणि अन्य प्रतिवादींना गुरुवारी दाखल झालेल्या दोन्ही याचिकांवर प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी १८ जानेवारी २०२७ रोजी होणार आहे.

नुकसानभरपाई, व्याज देण्याची मागणी

सर दोराबजी टाटा ट्रस्ट (एसडीटीटी) आणि आरडी टाटा ट्रस्ट (आरडीटीटी) यांनी गुरुवारी टाटा सन्स आणि त्यांच्या सहा संचालकांविरोधात याचिका दाखल करून चंद्रशेखरन यांच्या तिसऱ्या पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी झालेल्या पुनर्नियुक्तीला आव्हान दिले होते. ‘एसडीटीटी’ने ५० कोटी रुपये, तर ‘आरडीटीटी’ने १५ कोटी रुपये नुकसानभरपाई आणि त्यावर वार्षिक १८ टक्के व्याज देण्याची मागणी केली आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

शरद पवार गटाच्या भूमिकेबद्दल उत्सुकता

म. फुले यांची शेती संकल्पना आजही गरजेची

आजचे राशिभविष्य, २८ नोव्हेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

परदेशात रोमिंगची कटकट संपणार! आता WhatsApp वरूनच खरेदी करता येणार Travel eSIM, जिओसह अनेक कंपन्यांची भागीदारी

कल्याण-बदलापूर तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकेसाठी विशेष ब्लॉक