मंत्रालयातील गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाने फेस डिटेक्शन व डीजी प्रवेश ॲपप्रणाली अंमलात आणली. या प्रणालीमुळे गर्दीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले असून फेस डिटेक्शनचे १४ हजार ९७८ युजर आहेत. डीजी प्रवेश ॲपवर चार दिवसांत २,४२२ जणांनी नोंदणी केली आहे. मात्र कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या १३२१ जणांना डीजी प्रवेश ॲप आधारे मंत्रालयात प्रवेश देण्यात आला आहे. फेस डिटेक्शन व डीजी प्रवेश ॲप प्रणालीमुळे मंत्रालयात येणाऱ्यांच्या वेळेत बचत होत असून ताटकळत उभे राहण्याच्या त्रासातून सुटका झाली आहे.
मंत्रालय म्हटले की, व्हिव्हीआयपी, व्हीआयपी, सनदी अधिकारी आदींची ये - जा असते. त्यात मंत्रिमंडळाची बैठक असल्यास मंत्र्यांची भेट घेण्यासाठी अभ्यागत, पक्षाचे पदाधिकारी आदींची गर्दी होते. मंत्रिमंडळाची बैठक ज्या दिवशी असते त्यादिवशी त्या विभागातील अधिकारी व कर्मचारी राज्यभरातून येत असतात. व्हीव्हीआयपी, व्हीआयपी लोकांची ये - जा सुरू असल्याने सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत होता. मंत्रालयातील वाढत्या गर्दीवर उपाय म्हणून फेस डिटेक्शन व डीजी प्रवेश ॲप प्रणाली अंमलात आणली आहे. या प्रणालीचा वापर सुरू केल्यापासून गर्दीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे. मंत्रालयात येणाऱ्यांना पास काढण्यासाठी ताटकळत उभे राहण्याची कटकट दूर झाली आहे.
मंत्रालय सुरक्षा प्रकल्पातंर्गत पहिल्या टप्प्यात चेहरा ओळख आधारित प्रवेश प्रक्रिया कार्यान्वीत करण्यात आली आहे. टप्पा २ अंतर्गत प्रवेशासाठी व्हीजिटर मॅनेजमेंट सिस्टीमप्रणाली विकसित करण्यात आली आहे. मंत्रालयात क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, अभ्यागत यांना कोणत्याही कामासाठी प्रवेश हवा असल्यास त्यांना ‘डिजी प्रवेश’ या ऑनलाईन ॲप आधारित प्रणालीद्वारे मंत्रालयात प्रवेश मिळणार आहे. सद्यस्थितीत डीजी प्रवेश ॲपवर प्रवेश मिळवण्यासाठी दोन विंडो ऑनलाईन सुरू केल्या असून वाढता प्रतिसाद लक्षात घेता आणखी दोन विंडो ऑनलाईन सुरू करण्यात येणार आहे.
असे करा प्रवेश ॲप डाऊनलोड...
'डिजीप्रवेश’ ॲप हे मोबाईल ॲप ॲण्ड्राईड आणि आयओएस ॲपल या दोन्ही प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. आपल्या मोबाईल च्या प्रणालीनुसार ॲण्ड्राईडमध्ये प्ले स्टोअर वर तर आयओएस ॲपलवर ॲपल स्टोअरवर digi pravesh हे सर्च केल्यास हे ॲप विनामुल्य डाऊनलोड करता येते. या ॲपवर सुरूवातीला केवळ एकदाच नोंदणी करणे आवश्यक राहील. नोंदणी झाल्यानंतर आधार क्रमांकावर आधारीत यंत्रणेद्वारे छायाचित्राची ओळख पटवून नोंदणी पूर्ण केल्यानंतर ज्या विभागात काम आहे, त्याचा स्लॉट बुक करून रांगेशिवाय प्रवेश घेता येईल. या संपूर्ण प्रक्रियेला तीन मिनिटांपेक्षा कमी कालावधी लागतो.
फेस डिटेक्शन
१४,९७८ युजर
१० हजार लोक सिस्टममध्ये दाखल
५ ते ६ हजार लोकांकडून फेस डिटेक्शनचा वापर
डीजी प्रवेश ॲपवर नोंदणी
२५ ते २८ मार्च या चार दिवसांत २,४२२ लोकांनी डीजी प्रवेश ॲपवर नोंदणी केली. मात्र कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या १,३२१ जणांना डीजी प्रवेश ॲप आधारे मंत्रालयात प्रवेश देण्यात आला आहे.
मंत्रालयात येणाऱ्यांची गर्दी लक्षात घेता गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी फेस डिटेक्शन व डीजी प्रवेश ॲप प्रणाली अंमलात आणली आहे. या दोन्ही प्रणालीचा लाभ लोक घेत असून डीजी प्रवेश ॲप अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध माध्यमांतून जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे.
- चेतन निकम, उपसचिव, गृह विभाग