मुंबई

जागावाटपाबाबत ठाकरे बंधूंमध्ये गुफ्तगू; उद्धव ठाकरेंनी घेतली ‘शिवतीर्था’वर राज ठाकरेंची भेट, तासभर चर्चा

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र येणार याची गेले अनेक दिवस चर्चा सुरू आहे. मनसे आणि शिवसेनेची गेल्या काही दिवसांत जवळीक वाढली असून ठाकरे बंधूंच्या वारंवार गाठीभेटी होत आहेत.

Swapnil S

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र येणार याची गेले अनेक दिवस चर्चा सुरू आहे. मनसे आणि शिवसेनेची गेल्या काही दिवसांत जवळीक वाढली असून ठाकरे बंधूंच्या वारंवार गाठीभेटी होत आहेत. त्यातच गुरुवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दादर येथील ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी त्यांची भेट घेतली. यावेळी जवळपास तासभर झालेल्या चर्चेत जागावाटपावर चर्चा झाल्याचे समजते.

मनसेला सोबत घेण्यास काँग्रेस पक्षाने नकार दिल्यानंतर मनसे व शिवसेना बैठकीचे जोरदार सत्र सुरू आहे. मनसेचे सैनिक शिवसेनेच्या सैनिकांशी चर्चा करत असून आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी रणनीती आखली जात आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी २२७ वॉर्डांतील आरक्षणाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांमधील वरिष्ठ नेत्यांमध्ये जागावाटपाला सुरुवात झाली आहे. या बैठका अत्यंत गुप्तपणे घेण्यात आल्या होत्या.

या बैठकांमधून मनसेने मुंबईतील हमखास विजय मिळणाऱ्या १२५ जागांचा प्रस्ताव ठेवल्याचे बोलले जात आहे. मात्र, ठाकरेंच्या सेनेकडून मनसेला ७० ते ७५ जागा देण्याची तयारी दर्शवली असल्याचे समजते. परंतु मनसेने मागितलेल्या जास्त जागांवर ठाकरे सेनेचे नगरसेवक विजयी झालेले आहेत. त्यामुळे जागावाटपाचा निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी गुरुवारी सकाळी उद्धव ठाकरे यांनी थेट ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली.

या भेटीत जागावाटपाचा तिढा, महाविकास आघाडीत काँग्रेसकडून मनसेला होत असलेला विरोध व इतर महत्त्वाच्या राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याचे समजते. तसेच दोन्ही भावांनी एकत्र येत लढायचे झाले, तर जागावाटपाचे सूत्र काय असेल, यावर चर्चा केली. त्यामुळे जागावाटपात या दोन्ही ठाकरे बंधूंचा निर्णय अंतिम राहणार असून कुठल्या मतदारसंघातून कोणी लढायचे यावरही ते शिक्कामोर्तब करणार आहेत, अशी चर्चा झाल्याचे समजते.

जागावाटपाच्या पहिल्या फेरीत सकारात्मक चर्चा

तासाभराच्या चर्चेनंतर उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर पडले. यावेळी त्यांच्यासोबत आमदार वरुण सरदेसाई होते, तर दुसरीकडे मनसेचे ठाण्यातील नेते अविनाश जाधव चर्चेवेळी ‘शिवतीर्था’वरच होते. या चर्चेमध्ये कोणत्याही मोठ्या नेत्याचा सहभाग नसल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र, उद्धव ठाकरे हसतमुखाने बाहेर पडल्याने ठाकरे बंधूंमध्ये जागावाटपाची पहिली फेरी सकारात्मक झाल्याचे समजते.

उल्हासनगरात मतदानाला येणार ‘महाराष्ट्र’? विचित्र नोंदीवरून निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज हायकोर्टात सुनावणी

मुंबईतील प्रदूषित हवेची हायकोर्टाकडून दखल; कृती अहवाल सादर करण्यास विलंब, महापालिकेला स्पष्टीकरण देण्याचे निर्देश

अश्लील कंटेंटची जबाबदारी कोणाला तरी घ्यावी लागेल; ४ आठवड्यांत नियम तयार करण्याचे सुप्रीम कोर्टाचे केंद्राला आदेश

Mumbai : रेल्वे स्थानकांबाहेर फेरीवाल्यांचा धोका रोगासारखा फैलावतोय; हायकोर्टाने व्यक्त केली चिंता