मुंबई : मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट, अस्फाल्ट प्लांट भूखंडानंतर मुंबई महापालिकेने वरळी येथील सेच्युरी मिलचा भूखंड लिलाव करून भाडेतत्वावर (लीज) देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सेंच्युरी मिलचा भूखंड महापालिकेने १९६५ साली भाडेतत्त्वावर दिलेला होता. आता या भूखंडाची लीज संपुष्टात येत असल्याने तो पुन्हा ताब्यात घेण्यासाठी महापालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत.
सेंच्युरी मिलचा सुमारे २५ हजार चौरस मीटरचा भूखंड आहे. यापैकी काही जागा ही मिल कामगारांना घरे बांधण्यासाठी देण्यात आली होती. आता याठिकाणी ५०० घरे अस्तित्वात असून या झोपडीधारकांचे पुनर्वसन केल्यानंतर सदर भूखंड महापालिका ताब्यात घेऊन निविदा प्रक्रियेद्वारे खासगी विकासकांना लिलाव करणार आहे.
मालमत्ता करातून आवश्यक निधी उपलब्ध होत नसल्याने उत्पन्नवाढीचे मार्ग शोधण्यासाठी मुंबई महापालिकेने रिक्त भूभाग भाडेपट्टी धोरण आखले आहे. यासाठी महापालिकेने आता रिक्त आणि लीजवर दिलेले भूखंड लिलाव करून महसूल मिळविण्याचे ठरविले आहे. यासाठी सदर भूखंड विकासकांना विकास करण्यासाठी उपलब्ध होणार आहेत.
मुंबई महापालिकेत गेल्या चार वर्षांपासून प्रशासक असल्याने महापालिकेच्या तिजोरीतील पैशांची वारेमाप उधळपट्टी करण्यात आली. यामध्ये मुंबई सुशोभिकरणाच्या नावाखाली सुमारे १७,००० ते २,००० कोटी रूपये खर्च करण्यात आले. तसेच कोस्टल रोड, सिमेंट क्राँक्रीट रस्ते अशा विविध पायाभूत सुविधांसाठी पालिकेला मुदत ठेवीदेखील मोडाव्या लागल्या आहेत. अशा आर्थिक टंचाईतून महापालिका जात असल्याने आता प्रशासकांनी भूखंड लिलाव, अतिरिक्त चटईक्षेत्रापोटी अधिमूल्य आणि नियोजित कचराशुल्क असे धोरण आखले आहे.
पुढील आठवड्यात निघणार निविदा
सेच्युरी मिलचा भूखंड मुंबई महापालिकेने ४५ ते ५० वर्षांसाठी भाड्याने दिला होता. आता त्याचा भाडे करारनामा संपला आहे. लवकरच तो ताब्यात घेतला जाणार आहे. यानंतर नव्या धोरणानुसार लीजवर तो देण्यात येणार आहे. यासाठी महापालिका प्रशासनाकडून पुढील आठवड्यात निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या सुधार विभागातील सूत्रांनी दिली.