मुंबई

पालिकेची घागर रिकामी रे! BMC च्या मुख्यालयात टँकरने पाणीपुरवठा

मुंबईचा कारभार ज्या ठिकाणाहून हाकला जातो, त्याठिकाणी म्हणजेच मुंबई महापालिकेच्या मुख्यालय इमारतीला चक्क टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईचा कारभार ज्या ठिकाणाहून हाकला जातो, त्याठिकाणी म्हणजेच मुंबई महापालिकेच्या मुख्यालय इमारतीला चक्क टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच, पिण्यासाठी उपयुक्त असलेल्या या पाण्याचा वापर शौचालयांच्या वापरासाठी केला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे ‘पालिकेची घागर रिकामी रे’ असे म्हणायची वेळ आली आहे.

मुंबईच्या अनेक भागात सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याची बाब समोर असताना महापालिका मुख्यालयालाही टँकरने पाणीपुरवठा होत असल्याची बाब समोर आली आहे. मुंबई महापालिका मुख्यालयात मागील काही दिवसांपासून पाण्याची तीव्र समस्या निर्माण झाली असून फ्लशिंगसाठी असलेली पाण्याची टाकी भरली जात नसल्याने टँकरद्वारे ही टाकी भरली जात आहे. मुख्यालय इमारतीला कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने याठिकाणी असलेल्या टाक्या पूर्ण क्षमतेने भरल्या जात नाहीत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टाकी प्रथम भरली जाते. परंतु फ्लशिंगकरिता असलेली टाकी रिकामी राहत असल्याने मागील काही दिवसांपासून टँकर मागवून ही टाकी भरली जात आहे. या पाण्याच्या टाकीची क्षमता ५ हजार लिटर एवढी असून ही टाकी पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी पाच टँकरची आवश्यकता असते. त्यामुळे आझाद मैदान जलाशय भरणा केंद्रातून टँकर मागवून पाण्याची टाकी भरली जाते. हे पिण्याचे पाणी असून पिण्याव्यतिरिक्त अन्य वापरासाठी या पाण्याचा वापर केला जात आहे.

पंपामध्ये बिघाड

पालिका मुख्यालयाच्या टाकीत पाणी सोडण्याकरिता असलेल्या उदंचन संचात अर्थात पंपामध्ये बिघाड झाल्याने ही परिस्थिती उद्भवत आहे, अशी माहिती पालिका अधिकाऱ्याने दिली. तर या ठिकाणी पाणीच कमी दाबाने येत असल्याने येथील पाण्याची टाकी पूर्ण क्षमतेने भरत नाही. त्यातच या पाण्याच्या टाकीचे आणि पाणी सोडण्याचे नियोजन अनेक वर्षांपासून करणारा कामगार हा मागील १ जानेवारी रोजी सेवानिवृत्त झाला. तेव्हापासून ही समस्या अधिक निर्माण झाल्याची माहिती पाणी सोडणाऱ्या कामगारांनी दिली.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

कर्जमाफीवरून गदारोळ; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विधानसभेत विरोधक आक्रमक

शक्तिपीठ महामार्गाविरोधात आंदोलन; राजू शेट्टी यांच्यासह ४०० जणांवर गुन्हे दाखल

विधिमंडळ, सरकार, प्रशासनाचे नाते काय?

लव्ह जिहाद : भ्रम आणि वास्तव