राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने १५ मार्च ते ४ एप्रिल २०२२ या कालावधीत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल शुक्रवार, १७ जून रोजी जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजल्यापासून मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर त्यांचा वैयक्तिक निकाल पाहता येईल. राज्यातून एकूण १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. मुख्य केंद्र आणि उपकेंद्र मिळून २१ हजार ३८४ ठिकाणी परीक्षा पार पडली. विद्यार्थ्यांना गुणपत्रिका कधी मिळणार ते निकालादिवशी कळविण्यात येणार आहे. याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही ट्वीटरवर व्हिडिओ शेअर करत माहिती दिली आहे.
संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
विद्यार्थ्यांनी गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळामार्फत किंवा शाळांमार्फत अर्ज करायचा आहे. गुणपडताळणीसाठी सोमवार २० जून ते बुधवार २९ जूनपर्यंत अर्ज करायचा आहे. छायाप्रतीसाठी सोमवार २० जून ते शनिवार ९ जुलैपर्यंत अर्ज करायचा आहे. शुल्कही ऑनलाइन पद्धतीनेच भरायचे आहे.