मुंबई

राज्यात पुढील चार दिवसात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अतिजोरदार पावसाची शक्यता आहे.

प्रतिनिधी

राज्यात पावसाचा जोर सध्या कमी झाला असला तरी पुढील तीन ते चार दिवस वेगवेगळ्या शहरांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणात व घाट भागात काही ठिकाणी येत्या तीन ते चार दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याचे हवामानतज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले.

मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. २६ ऑगस्टपर्यंत मुंबईसह कोकणातील चार जिल्ह्यांत मुसळधार पावसाची स्थिती असेल. विदर्भातही १० जिल्ह्यांत दोन दिवसाच्या उघडीपीनंतर पुन्हा जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर ह्या चार जिल्ह्यांच्या पश्चिमेकडील सह्याद्रीतील घाटमाथ्यावरील घोटी, इगतपुरी, लोणावळा, मुळशी, ताम्हिणी, महाबळेश्वर, जावळी, बावडा, राधानगरी व परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात व मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत व विदर्भात काहीशी उघडीप जाणवत असली तरी दरम्यानच्या काळात त्यानंतर तेथे तुरळक ठिकाणी किरकोळ व हलक्या पावसाची शक्यता पुढील आठवडाभर कायम राहणार आहे.

राज्यातील काही भागात पूरस्थिती तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या मध्यम सरी कोसळत आहेत. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले आहे. नागरिकांनादेखील खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे मुंबईसह परिसरातदेखील रिमझिम पाऊस कोसळत असल्याचे चित्र आहे.

बंगाल उपसागरात ओरिसा व पश्चिम बंगालच्या किनारपट्टीदरम्यान समुद्रातून आलेले कमी दाबाचे पट्टे पूर्व किनारपट्टीवर बाळासोर व सागर बेटादरम्यान आदळून येत्या दोन ते तीन दिवसांत झारखंड व छत्तीसगडकडे मार्गस्थ होऊन तेथे जोरदार पावसानंतर क्षीण होण्याची शक्यता आहे. मान्सून २६ ते २७ ऑगस्टनंतर हळूहळू त्याच्या मूळ जागेपासून उत्तरेकडे हिमालयाच्या पायथ्याकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यानंतर महाराष्ट्रात उघडीप राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणपती उत्सवात पावसाची उघडीप राहील, अशी माहिती हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.

मुंबईतील बेकायदा बांधकामांचे वर्गीकरण करा! अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्यांवरही कारवाई, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अधिकाऱ्यांना इशारा

द्वेषपूर्ण, आक्षेपार्ह पोस्टसाठी आचारसंहिता तयार करा! सुप्रीम कोर्टाचे केंद्र, राज्यांना निर्देश

बोइंगच्या विमानांचे ‘फ्यूएल स्वीच’ तपासा; DGCA चे आदेश

जन (अ)सुरक्षा कायद्याविरुद्ध जनआंदोलन

राजकीय ‘सिच्युएशनशिप’च्या कात्रीत उबाठा