मुंबई

यंदाचा रक्षाबंधनाचा सण बंधनमुक्त साजरा होणार; धारावीतील राखी अमेरिकेतील भावांना पोहोचली

मार्च २०२० मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला आणि २४ मार्चपासून मुंबईत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते

प्रतिनिधी

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून धारावीतील राखी व्यवसायाला उतरती कळा लागली होती; मात्र यंदा कुठल्याही सणांवर निर्बंध नसून कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीतील तब्बल १५० कुटुंबीयांचा राखीचा व्यवसाय यंदा तेजीत आहे. विशेष म्हणजे, दोन वर्षे व्हॉट्सअॅपवर भावाला राखी पाठवणाऱ्या बहिणींनी यंदा धारावीतून राखी पाठवली आहे. त्यामुळे यंदाचा रक्षाबंधनाचा सण बंधनमुक्त असा साजरा होणार आहे.

मार्च २०२० मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला आणि २४ मार्चपासून मुंबईत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. मार्च २०२० ते डिसेंबर २०२१ पर्यंत कोरोनाच्या तीन लाटा मुंबईत धडकल्या होत्या. होळी, दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, रक्षाबंधन हे सगळे सण नियमांच्या चौकटीत राहून साजरे करावे लागले होते. मात्र मे महिन्यात कोरोनाच्या चौथ्या लाटेने शिरकाव केला; परंतु योग्य उपचार पद्धती व मुंबईकरांची साथ यामुळे चौथी लाट वेळीच रोखण्यात पालिकेला यश आले आहे. त्यामुळे रक्षाबंधन असो वा गणेशोत्सव प्रत्येक सण उत्साहात साजरा करता येणार आहे.

एप्रिल २०२०मध्ये धारावीत कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आणि संपूर्ण जगाचे लक्ष आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीकडे होते. कोरोनाकाळात चर्मोद्योग, कॅटरिंग, खाद्यपदार्थ बनवणे, राख्या बनवणे, कुंभारकाम, रिसायकलिंग असे अनेक लघु उद्योग असणार्‍या धारावीला मोठा फटका बसला; मात्र आता दोन वर्षांनी हे सर्व व्यवसाय आता पुन्हा सुरू झाले आहेत. यामध्ये तब्बल १५० कुटुंबे अवलंबून असणाऱ्‍या राखी व्यवसायातील ‘पटवा’ समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे.

संस्कृती, परंपरेचे प्रतीक राखीत

परदेशात राहणार्‍या भारतीयांसाठी पाठवण्यात आलेल्या राख्यांमध्ये पारंपरिक संस्कृतीप्रमाणे विविध डिझाइन आणि रंगीबेरंगी राख्या पाठवण्यात आल्या आहेत. यामध्ये लहान मुलांसाठी डोरोमॉन, छोटा भीम, बाल गणेश अशा राख्यांनाही परदेशात पसंती आहे. शिवाय देवदेवता, निर्सग अशा राख्यांनाही पसंती असते अशी माहिती ‘दोस्ती’ राखी आर्टच्या संगीता पटवा यांनी दिली.

मुख्यमंत्रीपदाचा फैसला आज; महायुतीचे नेते व केंद्रीय संसदीय मंडळ घेणार निर्णय

महायुतीत मंत्रिपदासाठी २१-१२-१० चा फॉर्म्युला

यशस्वी, विराटचा शतकी तडाखा; भारताचा दुसरा डाव ४८७ धावांवर घोषित; ऑस्ट्रेलियाची ३ बाद १२ अशी अवस्था

श्रीमंत ऋषभ पंत! सर्वाधिक २७ कोटींची बोली, अय्यर दुकलीसाठीही संघमालकांनी मोजले कोटी रुपये

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा