मुंबई

तीन कोटींच्या व्हाऊचरचा कॅशिअरकडून अपहार

नवशक्ती Web Desk

मुंबई, - मुलुंडच्या इनफिनिटी रिटेल लिमिटेड (क्रोमा स्टोअर्स) कंपनीच्या कॅशिअरने सुमारे तीन कोटी रुपयांच्या व्हाऊचरचा अपहार करुन कंपनीची फसवणूक केल्याचा प्रकार मुलुंडमध्ये उघड झाला आहे. याप्रकरणी कॅशिअर अनिकेत अनंत मोरे याच्याविरुद्ध मुलुंड पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. जितीन किशोर सहेतिया हे मुलुंडच्या इनफिनिटी रिटेल लिमिटेड (क्रोमा स्टोअर्स) या कंपनीत स्टोर मॅनेजर म्हणून कामाला आहेत. याच कंपनीत अनिकेत मोरे हा कॅशिअर म्हणून कामाला होता. त्याने गिफ्ट व्हाऊचरचा वापर करुन कंपनीची २ कोटी ६८ लाख ५६ हजाराची फसवणुक केली होती. त्यामुळे कंपनीच्या वतीने त्याच्याविरुद्ध अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. या गुन्ह्यांचा तपास नंतर मुलुंड पोलिसांत वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर या गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक आदिनाथ गावडे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. जितीन सहेतिया यांच्या अर्जानंतर त्यांना जबानी देण्यासाठी पोलीस ठाण्यात बोलावले होते. त्यात त्यांनी त्यांच्या कंपनीचे मुख्य कार्यालय मुलुंड येथील डंम्पिंग रोड, मुलुंड कलर्स स्पेस, मॉल धमाल येथे असल्याचे सांगितले. एप्रिल २०२३ रोजी कंपनीचे वार्षिक ऑडिट झाले होते. त्यात ३ कोटी १५ लाख रुपयांचे गिफ्ट व्हाऊचर वापरुन मुलुंडच्या क्रोमा स्टोअर्समधून सामान खरेदी करण्यात आले होते. मात्र गिफ्ट व्हाऊचर वापरुन ते सामान कंपनीत जमा झाले नव्हते. या संपूर्ण प्रकरणाची नंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी झाली. त्यात अनिकेत मोरे याने आपल्या पदाचा वापर करुन एप्रिल २०२२ ते एप्रिल २०२३ या कालावधीत हा घोटाळा केल्याचे उघडकीस आले होते. कंपनीच्या सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर अनिकेत मोरे हा कंपनी बंद झाल्यानंतरही रात्री एक वाजेपर्यंत काम करुन समोर ग्राहक नसताना गिफ्ट व्हाऊचर वापरुन रोख रक्कमेची फसवणुक करत होता. तो काही ठराविक वेंडरकडून सतत वस्तू खरेदी करत असल्याचे दिसून आले होते. त्याने क्रोमा स्टोअर्सला टप्याटप्याने एक कोटी नव्वद लाख रुपये दिले असून त्यामोबदल्यात त्यांच्याकडून गिफ्ट व्हाऊचर घेतले होते. याच गिफ्ट व्हाऊचरचा वापर करुन त्याने क्रोमामधून कोट्यवधी रुपयांची खरेदी केली होती. जितीन सहेतिया यांच्या जबानीनंतर अनिकेत मोरे याच्याविरुद्ध मुलुंड पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस