मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे अपघातात तीन वर्षांत ७,५६५ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ७,२९३ प्रवासी जखमी झाल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बुधवारी विधानसभेत दिली. तसेच रेल्वेला समांतर सेवेसाठी पॉड टॅक्सी, जल वाहतूक, हवाई टॅक्सीची चाचपणी सुरू असून खासगी आस्थापनातील कार्यालयीन वेळेत बदल करण्यासाठी टास्क फोर्सची स्थापन करण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. विधानसभा सदस्य अतुल भातखळकर यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे सभागृहात रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत असा मुद्दा उपस्थित केला, त्यावर उत्तर देताना मंत्री सरनाईक बोलत होते.
मुंब्रा रेल्वे अपघाताचे पडसाद बुधवारी विधानसभेत उमटले. रेल्वे अपघात रोखण्यासाठी आजही १५ डब्यांच्या लोकल चालवल्या जात नाहीत. मुंबई उपनगरीय रेल्वे अपघात रोखण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना करण्यात येत आहेत, रेल्वे अपघाताचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री, रेल्वे अधिकारी, रेल्वे पोलीस व राज्य सरकार यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येणार का?, असा मुद्दा यावेळी अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला. डबल इंजिन सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे मुंब्रा रेल्वे अपघातात प्रवाशांना जीव गमवावा लागला. हे चित्र बदलण्यासाठी आपल्याकडे नियोजन काय असा प्रश्न काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी यावेळी सभागृहात केला. तसेच ठोस उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
नाना पटोले यांच्यावर पलटवार
मेट्रो आणली त्यावेळी विरोधक म्हणाले हे काल्पनिक आहे. आज प्रत्यक्षात मेट्रो सुरू आहे. तसेच गुजरातमधील बडोदा येथे पॉड टॅक्सीची संकल्पना राबवण्यात येत असून एक-दोन महिन्यांत सुरू होईल. त्यामुळे विरोधक फक्त आरोप करतात, असा पलटवार सरनाईक यांनी नाना पटोले यांच्यावर केला.