मुंबई

कल्याण रेल्वे स्थानकाचा कायापालट सुरू गाड्यांचे वर्गीकरण होणार ; ८६६ कोटी खर्च

हा प्रकल्प २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. रेल्वेची सध्या वाहतूक पाहता ही वेळ गाठणे आव्हानात्मक काम आहे.

नवशक्ती Web Desk

मुंबई : कल्याण रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक आहे. लोकल आणि लांबपल्ल्याच्या गाड्या या स्थानकावर थांबतात. त्यामुळे दिवसाचे २४ तास व वर्षाचे ३६५ दिवस हे स्थानक गर्दीने ओसंडून वाहत असते. रेल्वेने लांबपल्ल्याच्या गाड्यांसाठी वेगळा मार्ग व लोकलसाठी वेगळा मार्ग करण्याचा प्रकल्प सुरू केला आहे. नवीन रेल्वे स्थानकासाठी ८६६ कोटी रुपये खर्च होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचा वेळ मोठ्या संख्येने वाचणार आहे.

कल्याण स्थानकात उत्तर व दक्षिणेकडे जाणाऱ्या लांबपल्ल्याच्या व लोकल सुटतात. जोपर्यंत सिग्नल मिळत नाही, तोपर्यंत प्रत्येक गाडीला कल्याणच्या पूर्वी थांबा घ्यावा लागतो. तो १५ मिनिटांपासून अर्धा तासही असू शकतो. त्यामुळे लोकल सेवा व लांबपल्ल्याची सेवा कल्याण स्थानकात वेगळा करण्याचा निर्णय घेण्यात आला. कल्याणला रेल्वे यार्डाची मोठी जागा आहे. या जागेचा वापर केला जाणार आहे.

नवीन प्रकल्पात सहा नवीन फलाट उभारले जाणार असून ते ६२० मीटर असतील. त्यावर केवळ लांबपल्ल्याच्या ट्रेन थांबतील. सध्या कल्याण स्थानकात आठ फलाट आहेत. त्यात लोकल व लांबपल्ल्याच्या सेवा चालवल्या जातात. त्यामुळे गाड्यांना मोठ्या प्रमाणावर विलंब होतो. नवीन फलाट तयार झाल्यानंतर लोकलना होणारा विलंब टळू शकेल.

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे म्हणाले की, या प्रकल्पामुळे लोकल व लांबपल्ल्याच्या गाड्यांचा वक्तशीरपणा व सुटसुटीतपणा वाढणार आहे. त्यामुळे लोकलची वाहतूक वेळेत होऊ शकेल.

नवीन प्रकल्पात सर्व फलाटांना जोडणारा एक विशेष पूल असेल. त्यामुळे प्रवाशांना कोणत्याही फलाटावर सहजपणे जाता येऊ शकेल. सध्या गार्डमध्ये सुधारणा होत आहेत. त्यामुळे मालवाहू गाड्यांची वाहतूक सुरळीत होईल. नवीन प्रकल्पात गाड्यांचे शटिंग, गाड्यांची तपासणीची सुविधा असेल. या प्रकल्पाचे जमिनीवरील काम ६० टक्के पूर्ण झाले आहे, तर पुलाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे.

जुने पूल तोडण्याचे काम सुरू आहे. तसेच रुळाशी संबंधित काम व जुन्या इमारतींची जागा बदलण्याची कंत्राटे दिली आहेत. हा प्रकल्प राबवताना रेल्वेची सध्याची वाहतूक व्यवस्था विस्कळीत होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. कल्याण रेल्वे यार्डात सुधारणा झाल्यानंतर कल्याण रेल्वे जंक्शनमध्ये सुधारणा होतील. रेल्वेची कार्यक्षमता अधिक वाढेल, असे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

हा प्रकल्प २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. रेल्वेची सध्या वाहतूक पाहता ही वेळ गाठणे आव्हानात्मक काम आहे. रेल्वेच्या परिचलन वेळेत बचत करणे व रेल्वे वेळेत चालवणे हे या प्रकल्पाचे लक्ष्य आहे. सध्या कल्याण रेल्वे स्थानकातून ७५० गाड्या रोज धावतात. या गाड्यांचे वेळापत्रक सांभाळून हे काम करणे कठीण आहे.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

प्रकल्पाचा खर्च - ८६६ कोटी

नवीन काय? - ६२० मीटरचे ६ नवीन फलाट, फक्त लांबपल्ल्याच्या गाड्या या फलाटावर थांबणार. सध्याचे फलाट केवळ लोकलसाठी

वेळेची बचत व परिचलनशीलता वाढणार

मुंबई : रुग्णालयांतील अन्न निकृष्ट निघाल्यास फक्त ₹१००० दंड; BMC च्या टेंडरमधील अटींवर तज्ज्ञांकडून सवाल

Mumbai : मलबार हिलमधील 'एलिव्हेटेड नेचर ट्रेल' पावसाळ्यात ठरला 'हॉटस्पॉट'; सुमारे ३ लाख पर्यटकांची भेट, BMC च्या खात्यात तब्बल...

...तर झाडे तोडण्याची परवानगी मागे घेऊ! मुंबई मेट्रो, GMLR प्रकल्पावरून सुप्रीम कोर्टाचा महाराष्ट्र सरकारला इशारा

भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यावरून सुप्रीम कोर्टाने सर्व राज्यांना फटकारले; मुख्य सचिवांना हजर राहण्याचे दिले आदेश

त्या 'जीआर'च्या स्थगितीस नकार; ओबीसी संघटनांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली