उरण : जागतिक वारसा स्थळ असलेल्या मुंबईच्या किनारपट्टीजवळील घारापुरी (एलिफंटा) बेटावरील मोराबंदर भागात सुरू असलेल्या पुरातत्वीय उत्खननात दोन ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वपूर्ण ताम्रपट सापडले आहेत. यामुळे चालुक्य व त्रैकुटक राजवंशांच्या कालखंडातील सागरी व्यापाराचे नवे पुरावे हाती लागले आहेत.
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, मुंबई मंडळाने २०२५-२६ च्या उत्खनन हंगामात हे ताम्रपट शोधून काढले आहेत. गोदामसदृश वास्तूच्या अवशेषांजवळ मिळालेल्या दोन मोठ्या रांजणांपैकी एका रांजणामध्ये हे ताम्रपट सुरक्षितरीत्या ठेवलेले आढळले. या ऐतिहासिक शोधामुळे एलिफंटा बेटाचे राजकीय, आर्थिक आणि सागरी महत्त्व नव्याने अधोरेखित झाले असून, हे बेट केवळ एक धार्मिक केंद्र नसून प्राचीन काळातील प्रमुख व्यापारी, प्रशासकीय आणि सागरी केंद्र होते यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
मोराबंदर येथील उत्खननात यापूर्वी प्राचीन सागरी व्यापाराची साक्ष देणारे अनेक अवशेष मिळाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने रोमन अँफोरीचे तुकडे (दारू किंवा तेल साठवण्याची प्राचीन भांडी), पश्चिम आशियाई टॉरपेडो जार, नीलमणी चकचकीत भांडी (टकॉईज ग्लेज्ड वेअर), हॅच्ड ग्राफिएटो बेअर, दगडांचे नांगर, लोखंडी तुकडे, आयात केलेली मातीची भांडी, नाणी आणि प्रगत जल-व्यवस्थापनाची साक्ष देणारा एक पायऱ्यांचा पाण्याचा साठा (stepped water reservoir) यांचा समावेश आहे. या सर्व अवशेषांवरून प्राचीन काळी या बेटावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर दूरवरच्या देशांशी सागरी व्यापार चालत असल्याचे स्पष्ट होते.
सापडलेल्या दोन ताम्रपटांपैकी पहिला ताम्रपट 'नवसारिकाचे चालुक्य' (आधुनिक नवसारी, गुजरात) या घराण्याशी संबंधित आहे. हे घराणे ७ व्या आणि ८ व्या शतकात दक्षिण गुजरात, उत्तर कोकण आणि नाशिक परिसरावर राज्य करत होते. या घराण्याची स्थापना बदामीचे प्रसिद्ध चालुक्य सम्राट पुलकेशी द्वितीय यांचे पुत्र आणि राजा विक्रमादित्यचे बंधू 'धराश्रय जयसिंहवर्मन' यांनी केली होती. या ताम्रपटासीबत असलेल्या राजमुद्रेवर स्पष्ट अक्षरांत "श्रीजयाश्रयः" असे कोरलेले आहे. यावरून हा ताम्रपट या वंशातील पराक्रमी राजा 'जयाश्रय मंगलरस' यांच्या काळातील असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
या शोधामुळे इतिहासकारांमधील एका शतकाहून अधिक जुन्या वादावर पडदा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सम्राट पुलकेशी द्वितीय यांच्या ऐहोळे शिलालेखात 'पश्चिम समुद्राची लक्ष्मी' समजल्या जाणाऱ्या 'पुरी' या किनारपट्टीवरील अभेद्य किल्ल्याचा नौदलाद्वारे पराभव केल्याचा उल्लेख आहे. ही 'पुरी' नगरी म्हणजेच आजचे घारापुरी (एलिफंटा) बेट असावे, असा तर्क अनेक विद्वानांनी मांडला होता, ज्याला आता या ताम्रपटाच्या शोधामुळे भक्कम पुरावा मिळाला आहे. नवसारिका चालुक्यांनी अरबांच्या आक्रमणापासून पश्चिम भारताचे यशस्वी रक्षण केले होते. हा ताम्रपट सिद्ध करतो की, या बेटावर केवळ बदामी चालुक्यांचे नियंत्रण नव्हते, तर नवसारिका चालुक्यांनी येथून गुजरात, कोकण आणि अरबी समुद्राशी जोडलेले मोठे व्यापारी जाळे विकसित केले होते.
उत्खननात मिळालेला दुसरा ताम्रपट 'त्रैकुटक' राजवंशातील महाराजा इंद्रसेन यांचा असून तो ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत दुर्मिळ मानला जात आहे. सन १८६४ मध्ये डॉ. भाऊ दाजी लाड यांनी कान्हेरी येथे सापडलेल्या ताम्रपटाच्या आधारे त्रैकुटक या विस्मृतीत गेलेल्या राजवंशाचा इतिहास उजेडात आणला होता. त्यानंतर तब्बल दीडशे वर्षांहून अधिक काळानंतर या वंशाचा नवा ताम्रपट घारापुरी बेटावर सापडला आहे. त्रैकुटक राजांनी इसवी सनाच्या चौथ्या ते सहाव्या शतकादरम्यान अपरांत (उत्तर कोकण), महाराष्ट्र, खानदेश आणि दक्षिण गुजरातवर राज्य केले होते.
त्रैकुटकांच्या अनेक ताम्रपटांमध्ये त्यांच्या 'अनिरुद्धपूर' या राजधानीचा उल्लेख येतो. स्थानिक लोककथांनुसार श्रीकृष्णाचा नातू अनिरुद्ध आणि बाणासुराची कन्या उपा यांच्याशी या बेटाचा संबंध जोडला जातो, ज्याला 'अनिरुद्धपूर' म्हटले जात असे. या नवीन ताम्रपटामुळे अनिरुद्धपूर म्हणजेच घारापुरी बेट असावे आणि हेच त्रैकुटकांचे राजकीय केंद्र असावे, या दाव्याला अधिक बळकटी मिळाली आहे. याशिवाय, उत्खननात पश्चिम क्षत्रप आणि कलचुरी कालीन नाणीही सापडल्यामुळे, या भागात क्षत्रपांनंतर त्रैकुटक आणि त्यानंतर कलचुरी सत्ता आली, हा राजकीय संक्रमणाचा क्रम पुरातत्वदृष्ट्या स्पष्ट झाला आहे.
एकत्रितपणे विचार केल्यास, हे दोन्ही ताम्रपट पश्चिम भारताच्या जवळजवळ तीनशे वर्षाच्या इतिहासावर प्रकाश टाकतात. या शोधांचे सविस्तर वाचन आणि वैज्ञानिक जतन पूर्ण झाल्यानंतर अधिक तपशीलवार माहिती समोर येईल, असे पुरातत्व विभागाने स्पष्ट केले आहे. या अभूतपूर्व शोधामुळे घारापुरी बेटाच्या जागतिक वारशात आता एक नवे सुवर्णपान जोडले गेले आहे.
त्रैकुटक घराण्याचे संस्थापक इंद्रसेन यांचा दुर्मिळ ताम्रपट
आतापर्यंत त्रैकुटक राजवंशाचे केवळ पाच ताम्रपट (पार्डी, सुरत, कान्हेरी आणि मातवण येथे) उपलब्ध होते. विशेष म्हणजे, या वंशाचे संस्थापक 'इंद्रदत्त' यांच्या नावाचा कोणताही थेट शिलालेख किंवा नाणे आजवर मिळाले नव्हते, त्यांचा उल्लेख केवळ त्यांच्या पुत्रांच्या ताम्रपटांवरून अप्रत्यक्षपणे होत असे. मात्र, घारापुरी येथे सापडलेला ताम्रपट राजा 'इंद्रसेन' (इंद्रदत्त) यांचा असल्याने, त्रैकुटक घराण्याच्या संस्थापकाचा हा जगातील पहिला आणि एकमेव थेट लिखित ऐतिहासिक पुरावा ठरण्याची शक्यता आहे.