मुंबई : हिंदी भाषा सक्तीला वाढता विरोध लक्षात घेता शासन निर्णय रद्द केल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधत मराठी अमराठी वाद होत नाही, मराठी माणूस एकत्र येऊ नये यासाठी शासन निर्णय रद्द केल्याचा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.
सरकारने कोणतीही समिती नेमली तरी महाराष्ट्रात हिंदी सक्ती होऊ देणार नाही, या शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपला ठणकावले. दरम्यान, ५ तारखेला विजयोत्सव साजरा केला जाणार असून रविवारी केलेल्या आंदोलनात पक्षभेद विसरून सर्व एकत्र आले होते. तीच एकजूट विजयोत्सवात दाखवा, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
मराठी मराठीत वाद निर्माण व्हावा मराठी माणसांत फूट पडावी यासाठी हा डाव रचला होता. मात्र मराठी माणसाची एकजूट सरकारच्या लक्षात आली आणि हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द करावा लागला. सोमवारपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे हे विधिमंडळात हजेरी लावली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाच्या कामकाजानंतर विधिमंडळाच्या आवारात उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. हिंदी सक्तीच्या मुद्द्यांवरून सरकारवर टीकेची झोड उठवली. सरकारला सुचलेल्या शहाणपणामुळे तूर्त त्यांनी हिंदी सक्तीचा जीआर रद्द केला. अन्यथा ५ तारखेच्या मोर्चात आमच्यासहित भाजप, एसंशि (शिवसेना), अजित पवार यांच्या पक्षातील अनेक मराठीप्रेमी सहभागी होणार होते. असे सांगत मातृभाषेचे प्रेम हे पक्षाच्या पलीकडचे असले पाहिजे, असे ते म्हणाले. मराठी-अमराठी करायचे, मराठी भाषिकांमध्ये फूट पाडायची, हा या सरकारचा एक कुटिल डाव होता. मात्र फूट पडत नसल्याचे लक्षात येताच, जीआर रद्द केला, असे ते म्हणाले.
बावनकुळेंना टोपी !
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच हिंदी शक्ती जीआर रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यावर मी मराठी लिहिलेल्या टोप्या घालून जल्लोष व्यक्त केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यावेळी समोर आले असता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांच्या डोक्यावर मी मराठीची टोपी घातली. त्यांनीही दोन मिनिटे टोपी घालून आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. आदित्य ठाकरे यांनी यावेळी बावनकुळे यांना हस्तांदोलन करीत जीआर रद्द केल्याबद्दल आनंद व्यक्त केला.