मुंबई

ज्यांना पक्षाने वाचविले त्यांचाच शिवसेना संपविण्याचा प्रयत्न ;उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा

Swapnil S

प्रतिनिधी/मुंबई: शिवसेनेने ज्यांना कधी काळी वाचविले, त्यांनीच शिवसेना संपविण्याचा प्रयत्न केला. सध्या सत्तेत असलेले काही लोक हिंदूंमध्ये मतभेद निर्माण करत असल्याचे सांगत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. शुक्रवारी मुंबई उपनगरातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. ठाकरेंनी त्यांचे स्वागत केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

ठाकरे म्हणाले की, ‘‘कठीण काळात सोबत येतो, त्याचे महत्त्व वाढते. सत्तेच्या दिशेने जाणारे अनेक असतात. मात्र, सत्ता ज्या पक्षाकडे आहे, त्यांना सोडून ज्यांच्यासोबत लढाई त्यांच्यासोबत जायचे, हे अत्यंत कठीण असते. मात्र, तो मर्दपणा तुम्ही दाखवला. मातोश्रीवर अनेक लोक येतात. माझ्या वडिलांकडे सुद्धा मदत मागायला अनेकजण येत होते. आम्हाला वाचवा, अशी विनवणी करणाऱ्या लोकांना बाळासाहेबांनी वाचवले होते. तेच आज बाळासाहेबांची शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, शिवसेना संपवण्याचा कितीही प्रयत्न करा, आम्ही लढणारे आहोत. आम्हाला संपवणारे कुणी असूच शकणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी भाजपचे नाव न घेता बजावले. तसेच ज्यांना आम्ही मित्र समजलो, त्यांनीच आम्हाला शत्रू बनवल्याचा हल्लाबोल भाजपवर केला.

‘‘भगव्या रंगात कोणता फरक नसतो. छत्रपती शिवाजी महाराज, प्रभू श्रीरामचंद्र, भगवान कृष्ण आणि भवानी मातेचा भगवा एकच आहे. परंतु, काहीजण भगव्यात, हिंदुत्वात भेद करण्याचा प्रयत्न करत आहेत. १९९२-९३ साली मुंबईला शिवसेना, शिवसैनिकांनी वाचवले होते. प्रत्येक संकटात, दंगल, नैसर्गिक आपत्तीत मदत करण्यात शिवसेना अग्रही असते. संकटात असलेल्या प्रत्येकाला मदत करण्याची शिकवण बाळासाहेबांनी दिली. जात-धर्म, प्रांत असा भेदभाव करत नाही, असे सांगत ठाकरेंनी भाजपला ठणकावले. ज्यावेळी 'हम हिंदू है' असे उच्चार करण्यास भीती वाटत असताना, बाळासाहेबांनी 'गर्व से कहो हम हिंदू है' असा नारा दिला. दिवंगत बाळासाहेब आणि भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्यातील हिंदू राष्ट्राबाबत झालेल्या चर्चेच्या आठवणींना ठाकरेंनी उजाळा दिला. त्यावेळी संघर्ष करणारे वेगळे होते. आता केवळ लाभ घेणारे बसले आहेत. संघर्षाशी त्यांचे काही घेणेदेणे नसल्याचा टोला भाजपला लगावला.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त