मुंबई : पश्चिम रेल्वेच्या वाणगाव येथील प्रस्तावित एसी लोकल देखभाल सुविधा प्रत्यक्ष साकारण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे पडले आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) डेपोच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ३७१.४९ कोटींची निविदा जाहीर केली आहे.
'पीरियॉडिक ओव्हरहॉल' कम ईएमयू देखभाल डेपो आणि स्टॅबलिंग सायडिंगचा समावेश असलेल्या या प्रकल्पाचे काम कंत्राटदाराची नियुक्ती झाल्यापासून ३६ महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
मुंबई नागरी परिवहन प्रकल्प 'एमयूटीपी-३' आणि 'एमयूटीपी-३ए' अंतर्गत वाणगाव आणि डहाणू रोड दरम्यानच्या सध्याच्या रेल्वे मार्गाच्या पश्चिम बाजूला हा डेपो उभारला जाणार आहे. वाढत्या एसी लोकल ताफ्याची देखभाल आणि मोठ्या दुरुस्तीची गरज भागवण्यासाठी हे केंद्र उभारले जाणार आहे. मध्य रेल्वेतर्फे अशाच प्रकारची सुमारे ६० लोकल हाताळण्याची क्षमता असलेली सुविधा भिवपुरी येथेही प्रस्तावित आहे.
मुख्य डेपो कार्यरत होण्यापूर्वी आवश्यक असलेल्या अनेक पूर्वतयारी आणि पायाभूत सुविधांच्या कामांचा या निविदेत समावेश आहे.
यामध्ये मातीकाम आणि भराव विकास, पुलाचा विस्तार, रिटेनिंग वॉल-कम-बाउंड्री वॉलचे बांधकाम आणि रस्ते बांधणी यासह इतर संबंधित कामांचा समावेश आहे. या प्रकल्पात स्टॅबलिंग सायडिंगचाही समावेश असेल, जिथे उपनगरीय ट्रेन्स सेवेत नसताना उभ्या केल्या जाऊ शकतील.
वाणगाव येथील ही सुविधा प. रेल्वे नेटवर्कवरील वाढत्या एसी लोकल ताफ्याला आधार देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे.
भविष्यातील ताफ्यासाठी उपयुक्त ठरणार
एमआरव्हीसी २३८ एसी लोकल ट्रेन्स खरेदी करण्याची योजना आखत असल्याने या विकासाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या ट्रेन्स भारतीय रेल्वेच्या इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नई, रेल्वे कोच फॅक्टरी, कपूरथला आणि मॉडर्न कोच फॅक्टरी, रायबरेली उभारल्या जाणार आहेत. एमआरव्हीसीच्या योजनेनुसार, पहिली प्रारूप ट्रेन २०२७ पर्यंत येणे अपेक्षित आहे, तर संपूर्ण एसी लोकल ताफा २०३० पर्यंत सेवेत समाविष्ट करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.