वसई : पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा यांनी पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक रामाश्रय पांडेय यांची भेट घेऊन पालघर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या विविध प्रलंबित मागण्या आणि समस्यांकडे तातडीने लक्ष वेधले.
या बैठकीस कैलाश वर्मा आणि संकेत ठाकूर उपस्थित होते. यावेळी पहाटे ४ वाजेदरम्यान डहाणूहून चर्चगेटकडे नवीन लोकल सेवा सुरू करण्याबाबतही पश्चिम रेल्वेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती देण्यात आली. यामध्ये हिसार-खडकी (२२९७९/२२९८०), तिरुचिरापल्ली-अहमदाबाद, वांद्रे-अजमेर (१९६२५/१९६२६), अहमदाबाद-मंगळूर, मुंबई-काठगोदाम (२१९०७/२१९०८) आणि वांद्रे-जबलपूर (२०१६३/२०१६४) या गाड्यांचा समावेश आहे.तसेच, वांद्रे-सुरत इंटरसिटी एक्स्प्रेस (१२९३५/१२९३६) आणि वांद्रे-गाझीपूर एक्स्प्रेस (२०९४१/२०९४२) या गाड्यांना थांबा देण्याची व्यवहार्यता रेल्वेकडून यापूर्वी तपासण्यात आली असून, त्यास त्वरित मंजुरी देऊन अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली.याशिवाय वांद्रे-भावनगर (१२९७१/१२९७२), दौंड-इंदूर (२२९४३/२२९४४), दादर-अजमेर (१२९८९/१२९९०) आणि सूर्यनगरी एक्स्प्रेस (१२४७९/१२४८०) यांनाही पालघर स्थानकावर थांबा देण्याची मागणी करण्यात आली.
डहाणू रोड स्थानकावरील फलाट क्रमांक ४ आणि ५ यांची लांबी वाढवून ती १५ डब्यांच्या गाड्यांसाठी योग्य करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली. नोकरदार वर्गासाठी पहाटे ४ वाजता डहाणूहून चर्चगेटकडे आणि दुपारी २ वाजता चर्चगेटहून डहाणू रोडकडे नवीन उपनगरीय सेवा सुरू करण्याबाबतही चर्चा झाली.
औद्योगिक वाढ लक्षात घेता डहाणू रोड आणि बोईसर स्थानकांवर अतिरिक्त थांब्यांची आवश्यकता असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. डहाणू रोड स्थानकावर पुणे-भुज एक्स्प्रेस (११९०१/११९०२) आणि खान्देश एक्स्प्रेस (१९००३/१९००४) यांना थांबा देण्याची मागणी करण्यात आली. तर बोईसर स्थानकावर कोईम्बतूर-राजकोट एक्स्प्रेस (१६६१३/१६६१४) आणि वांद्रे-रामनगर एक्स्प्रेस (२२९७५/२२९७६) यांना थांबा देण्याची मागणी करण्यात आली.
विरार-डहाणू चौपदरीकरण आणि उपनगरीय सेवा
विरार-डहाणू चौपदरीकरणाचे काम संथ गतीने सुरू असल्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे खासदार सवरा यांनी निदर्शनास आणून देत हे काम जलदगतीने पूर्ण करण्याची मागणी केली.विरार-डहाणू मेमू (६९१७३/६९१७४) सेवेचा विस्तार उमरगाव रोडपर्यंत (UBR) करण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली. तसेच प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन ९३००२, ९३००४ आणि ९३०३३ या उपनगरीय गाड्यांचे १५ डब्यांच्या गाड्यांमध्ये रूपांतर करण्याची मागणी करण्यात आली.
कोलगाव येथे पादचारी पुलाची मागणी
कोलगाव (पालघर) येथील जेनेसिस इंडस्ट्रियल टाऊनशिपजवळील रेल्वे गेट क्रमांक ४८ कायमस्वरूपी बंद करण्यात आल्याने दररोज सुमारे ३ ते ४ हजार कामगार आणि स्थानिक नागरिक जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडत असल्याची बाब खासदार सवरा यांनी निदर्शनास आणून दिली. सध्याचा उड्डाणपूल सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असल्याने त्याचा कामगारांना विशेष उपयोग होत नसल्याचे सांगत, बंद करण्यात आलेल्या रेल्वे गेट क्रमांक ४८ जवळ तातडीने पादचारी पूल (FOB) उभारण्याची मागणी करण्यात आली.