मुंबई

वसई-विरारमध्ये निवडणूक चिन्हे अस्पष्ट; निवडणूक विभागाच्या अनागोंदी कारभारावर टीका; ठाकरे गट, 'बविआ'कडून तीव्र संताप

वसई-विरार महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडाव्यात, यासाठी प्रशासन आणि निवडणूक विभाग कार्यरत असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र निवडणूक चिन्हांबाबत सावळागोंधळ उघडकीस आला आहे. ईव्हीएमवरील काही पक्षांची निवडणूक चिन्हे अस्पष्ट, पुसट व फिकट दिसत असल्याने शिवसेना (ठाकरे गट) आणि बहुजन विकास आघाडीने यावर तीव्र आक्षेप नोंदविला आहे.

Swapnil S

वसई : वसई-विरार महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडाव्यात, यासाठी प्रशासन आणि निवडणूक विभाग कार्यरत असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र निवडणूक चिन्हांबाबत सावळागोंधळ उघडकीस आला आहे. ईव्हीएमवरील काही पक्षांची निवडणूक चिन्हे अस्पष्ट, पुसट व फिकट दिसत असल्याने शिवसेना (ठाकरे गट) आणि बहुजन विकास आघाडीने यावर तीव्र आक्षेप नोंदविला आहे.

भारतीय जनता पक्षाचे 'कमळ' हे चिन्ह तुलनेने अधिक गडद (डार्क) आणि स्पष्ट दिसत असून, शिवसेना (ठाकरे गट) तसेच बहुजन विकास आघाडीच्या चिन्हांची स्पष्टता कमी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय बहुजन विकास आघाडीचे चिन्ह निवडणूक आयोगाच्या अधिकृत प्रसिद्धी यादीप्रमाणे नसून, मशीनवर वेगळ्या स्वरूपात आणि उलटे दाखवण्यात आल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.

वसई-विरार महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात ईव्हीएम मशीनची पडताळणी सुरू असताना उमेदवार आणि प्रतिनिधींच्या उपस्थितीत ही बाब निदर्शनास आल्याचे सांगण्यात आले. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्व राजकीय पक्षांची निवडणूक चिन्हे समान गडदपणा, समान स्पष्टता आणि कोणताही भेदभाव न होता दिसणे आवश्यक असते. मात्र प्रत्यक्षात तसे आढळून न आल्याने मतदानाच्या दिवशी मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असल्याचे मत शिवसेना (ठाकरे गट)चे शशिभूषण शर्मा यांनी व्यक्त केले. बहुजन विकास आघाडीचे संदेश जाधव यांनी सांगितले की, वसई येथील सेंट ऑगस्टीन मतदान केंद्रातील निवडणूक अधिकाऱ्यांसमोर या त्रुटींची स्पष्ट नोंद घेण्याची मागणी करण्यात आली आहे. निवडणूक चिन्हे अस्पष्ट व पुसट असल्याबाबत विविध पक्षांनी लेखी निवेदनही दिले. मात्र त्यावर ठोस निर्णय न देता ईव्हीएम सील करण्यात आल्याचे उपस्थित कार्यकर्त्यांनी सांगितले.

दरम्यान, या प्रकाराकडे गांभीर्याने पाहून तातडीने योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली असल्याची माहिती ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी राजाराम बाबर यांनी दिली. जर याचा परिणाम मतदान प्रक्रियेवर किंवा निवडणूक निकालावर झाला, तर आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

इराणी युद्धनौकेवर अमेरिकेच्या पाणबुडीचा हल्ला, ८७ ठार; श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ झालेल्या हल्ल्यात जहाजाला जलसमाधी

अयातुल्ला खामेनींचे उत्तराधिकारी म्हणून पुत्र मोज्तबा यांची निवड?

आठवले, तावडे यांना राज्यसभेची उमेदवारी; उमेदवार यादीत भाजपचे धक्कातंत्र

Mumbai : चेंबूर येथील दुर्घटनेत आणखी दोघांचा मृत्यू

राज्यसभा निवडणुकीतून 'मविआ'चा फैसला