वसई-विरारला पूरमुक्त करण्यासाठी १०० कोटींची गरज; महापौर अजीव पाटील यांची मागणी संग्रहित छायाचित्र
मुंबई

वसई-विरारला पूरमुक्त करण्यासाठी १०० कोटींची गरज; महापौर अजीव पाटील यांची मागणी

वसई-विरार शहरातील दरवर्षी उद्भवणाऱ्या पूरस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महानगरपालिकेने १०० कोटी रुपयांची विशेष आर्थिक तरतूद करावी, अशी महत्त्वपूर्ण मागणी महापौर अजीव पाटील यांनी पालिका व रेल्वे प्रशासनाच्या संयुक्त बैठकीत केली. मंगळवारी पालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीत पूरनियंत्रणासाठी विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

Swapnil S

वसई : वसई-विरार शहरातील दरवर्षी उद्भवणाऱ्या पूरस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महानगरपालिकेने १०० कोटी रुपयांची विशेष आर्थिक तरतूद करावी, अशी महत्त्वपूर्ण मागणी महापौर अजीव पाटील यांनी पालिका व रेल्वे प्रशासनाच्या संयुक्त बैठकीत केली. मंगळवारी पालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीत पूरनियंत्रणासाठी विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

महापौरांनी सांगितले की, २०१७ पासून शहराला सातत्याने पुराचा फटका बसत असून यंदाही ४ ते ८ जुलैदरम्यान झालेल्या विक्रमी पावसामुळे अनेक भाग जलमय झाले. दरवर्षी नालेसफाईवर कोट्यवधी रुपये खर्च होत असले तरी पावसाच्या पाण्याचा निचरा प्रभावीपणे होत नसल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे केवळ नालेसफाईवर भर न देता पावसाळी पाणी निचऱ्यासाठी दीर्घकालीन आणि शाश्वत योजना राबविण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

यासाठी शहरातील ज्येष्ठ नागरिकांकडून नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहाची माहिती घेऊन त्यानुसार नियोजन करावे, अडथळा ठरणारी कांदळवने वन विभागाच्या परवानगीने हटवावीत तसेच बंद झालेल्या नैसर्गिक पाण्याच्या वाटा ग्रामस्थांशी समन्वय साधून पुन्हा सुरू कराव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. आवश्यक ठिकाणी नवीन नाले उभारण्यासाठी जमीन संपादनाचाही विचार करण्याचे त्यांनी सुचविले.

रेल्वे हद्दीतील नाले व कलव्हर्टची अपुरी सफाई, तसेच रेल्वे मार्ग रुंदीकरणाच्या कामांमुळे नैसर्गिक निचरा बाधित होत असल्याकडे महापौरांनी रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले. मुख्य नाल्यांचे खाडीपासून उगमस्थानापर्यंत किमान १५० मीटर रुंदीकरण करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. रेल्वे प्रशासनानेही आपल्या हद्दीत नवीन गटारे व नाले उभारण्याची कामे तातडीने हाती घ्यावीत, असे आवाहन त्यांनी केले.

बैठकीला आयुक्त पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत, संजय हेरवाडे, शहर अभियंता प्रदीप पाचंगे, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी तसेच स्थायी समिती सभापती प्रवीण शेट्टी, सभागृह नेते प्रफुल्ल साने, उपमहापौर मार्शल लोपीस आणि अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मुंबईत मलेरिया, डेंग्यूचे थैमान! डेंग्यूच्या रुग्णांमध्ये २८ तर मलेरियाच्या रुग्णांमध्ये १८ टक्क्यांनी वाढ; आजारांमुळे पालिका प्रशासनाची धावपळ

सिंहगडमध्ये 'अल्पसंख्याकांना प्रवेशबंदी'चा फलक; वादग्रस्त फलक पोलिसांनी हटवला, तपास सुरू

उद्धव ठाकरे म्हणाले, थोडं थांबा..आपले चांगले दिवस येणार! नाशिक महापालिकेतील नगरसेवकांशी ‘मातोश्री’वर खलबते

बोरघाटातील दुसरी लाईन दुरुस्त; आजपासून डेक्कन क्वीन, इंटरसिटी धावणार

उंच पीओपी मूर्तींचे नैसर्गिक जलस्त्रोतात विसर्जन नको! परवानगी न देण्यासाठी हायकोर्टाला साकडे