मुंबईत अग्नितांडव! विलेपार्लेतील उच्चभ्रू इमारतीला भीषण आग; अडीच वर्षांच्या चिमुरड्यासह दोघांचा मृत्यू, VIDEO 
मुंबई

मुंबईत अग्नितांडव! विलेपार्लेतील उच्चभ्रू इमारतीला भीषण आग; अडीच वर्षांच्या चिमुरड्यासह दोघांचा मृत्यू, VIDEO

विलेपार्ले पश्चिम येथील शांता भवन इमारतीच्या ११व्या मजल्यावर लागलेल्या भीषण आगीत अडीच वर्षांच्या चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. सुमारे तीन तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली.

Mayuri Gawade

मुंबई : विलेपार्ले पश्चिम येथील एका निवासी इमारतीच्या ११व्या मजल्यावर मंगळवारी (दि. ११) रात्री भीषण आग लागली. या दुर्घटनेत अवघ्या अडीच वर्षांच्या चिमुकल्यासह दोन जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. सुमारे तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाने रात्री १ वाजण्याच्या सुमारास आग पूर्णपणे विझवली.

रात्री १० वाजता लागली आग

विलेपार्ले पश्चिम येथील बाप्टिस्टा मार्गावर सेंट झेवियर्स स्कूलजवळ असलेल्या शांता भवन या तळमजला अधिक १२ मजली इमारतीत ही घटना घडली. मंगळवारी रात्री सुमारे १० वाजता इमारतीच्या ११व्या मजल्यावर आग लागल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाला मिळाली.

रात्री १०.०८ वाजता लेव्हल-१ आग घोषित करण्यात आली. मात्र, आगीची तीव्रता पाहता अवघ्या काही मिनिटांत म्हणजे १०.१६ वाजता ती लेव्हल-२ करण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलासह पोलीस, वीज वितरण कंपनी, १०८ रुग्णवाहिका सेवा आणि मुंबई महापालिकेच्या संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले.

४ हजार चौरस फुटांच्या परिसराला आगीचा विळखा

अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, ११व्या मजल्यावरील ११०१ आणि ११०२ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये सुमारे ४ हजार चौरस फुटांच्या परिसरात आग पसरली होती. इलेक्ट्रिक वायरिंग आणि इतर विद्युत उपकरणांसह एसी, सोफा, बेड, फॉल्स सीलिंग, घरातील साहित्य आणि स्वयंपाकघरातील वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. अग्निशमन दलाने बचावकार्य करत बाधित नागरिकांना बाहेर काढले आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

अडीच वर्षांच्या चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू

या दुर्घटनेत एकूण आठ जण बाधित झाले. त्यापैकी अडीच वर्षांचा अबीर आणि २३ वर्षीय अंकिता यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले. जखमींपैकी पार्थ (३२) आणि हिरेन (६४) यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यशस्वी (३३) आणि अभिषेक यांच्यावर उपचार करून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

बचावकार्यादरम्यान अग्निशमन दलाचे जवान मनोज सोनावणे (३०) आणि शिवम द्विवेदी (२९) हेही जखमी झाले होते. त्यांच्यावर कूपर रुग्णालयात उपचार करण्यात आले आणि त्यानंतर दोघांनाही घरी सोडण्यात आले.

तीन तासांनंतर आग पूर्णपणे विझली

अग्निशमन दलाकडून जवळपास तीन तास आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर बुधवारी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास आग पूर्णपणे विझवण्यात आली.

दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सविस्तर तपासानंतर आगीचं नेमकं कारण समोर येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : घाटकोपरमध्ये दरड कोसळली; ६ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू, Video

कोणत्या हिंदू धर्मग्रंथात पीओपी मूर्तींचे विसर्जन अनिवार्य आहे? हायकोर्टाचा सवाल

खिशाला कात्री! राज्यभरात दुधाची दरवाढ लागू; गायी-म्हशीचं दूध २ रुपयांनी महाग, दुग्धजन्य पदार्थही १० टक्क्यांपर्यंत महागणार?

TET पेपरफुटीप्रकरणी सोलापूर कनेक्शन; स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण केंद्र चालवणाऱ्या प्रकाश पवारला अटक

ठाणेकरांवर दुहेरी आर्थिक भार? मालमत्ता हस्तांतरण शुल्कवाढीचा प्रस्ताव; १८० एसी ई-बसेससाठी १,०९६ कोटींचा खर्च