मुंबई : विद्यार्थ्यांच्या आत्महत्येला कारणीभूत ठरलेल्या, लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची हेळसांड करणाऱ्या शिक्षण मंत्र्याला वाचवण्यासाठी मोदी सरकारने दडपशाहीच्या सर्व मर्यादा पार केल्या. मोदी सरकारने सोनम वांगचुक यांच्यासोबत कोणताही संवाद न करता थेट त्यांना फरफटत नेले असून ही अघोषित आणीबाणी आहे, अशी टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी केली.
नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी उपोषण आंदोलन करणाऱ्या शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतले. या प्रकरणी वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
"सत्य, अहिंसा आणि संविधानाच्या मार्गाने लढणाऱ्या एका निःशस्त्र गांधीवादी शास्त्रज्ञावर हजारो पोलिसांचा गराडा घालण्याइतके केंद्र सरकार असुरक्षित झाले आहे का? सलग २० दिवसांच्या उपोषणामुळे शरीर क्षीण झालेल्या सोनम वांगचुक यांच्यावर पोलीस बळाचा वापर करताना केंद्र सरकारला लाज वाटली नाही का?" अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
आंदोलकांच्या मागण्यांवर मार्ग काढावा -जयंत पाटील
सोनम वांगचुक यांच्या मागण्यावर विचार न करता आंदोलन दडपण्यासाठी त्यांना आंदोलनस्थळावरून दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेऊन दवाखान्यात हलवल्याची घटना अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे सरकारने आंदोलकांच्या मागण्यांवर संवेदनशीलतेने चर्चा करून मार्ग काढावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे.