वाढदिवसानिमित्त कुटुंबीय आणि मित्रांसोबत डिनरसाठी गेलेल्या ग्राहकाला डेझर्टच्या प्लेटमध्ये झुरळ आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विरारमधील बार्बेक्यू नेशन आउटलेटमधील हा प्रकार १९ ऑगस्ट रोजी घडल्याचं सांगितलं जात आहे. यश राऊत या 'एक्स' (X) वापरकर्त्याने एक व्हिडिओ शेअर करत भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाकडे (FSSAI) संबंधित आउटलेटची तपासणी करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर FSSAIच्या अधिकृत सपोर्ट हँडलने Food Safety Connect ॲपद्वारे तक्रार नोंदवण्याचा सल्ला दिला.
डेजर्टच्या प्लेटवर फिरतंय झुरळ
यश राऊत हा पाच जणांच्या ग्रुपसोबत संबंधित रेस्ट्रोरंटमध्ये गेला होता. त्याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये डेझर्टच्या प्लेटवर झुरळ फिरताना दिसतेय. हा प्रकार कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर संबंधित कर्मचारी प्लेट घेऊन जाताना व्हिडीओमध्ये दिसतं आहे. यानंतर रेस्टॉरंटच्या स्वयंपाकघरही अस्वच्छ असल्याचेही त्याने व्हिडीओमधून निदर्शनास आणून दिले. त्यामुळे आउटलेटमधील स्वच्छता आणि सॅनिटेशनच्या व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
'प्रीमियम किंमत, पण स्वच्छता शून्य'
यश राऊत याने एक्सवरील पोस्टमध्ये या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली. रेस्टॉरंटकडून ‘प्रीमियम दर’ आकारले जात असताना स्वच्छतेचा दर्जा मात्र समाधानकारक नसल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच FSSAIला टॅग करत संबंधित आउटलेटची तपासणी करण्याची मागणी केली. रेस्टॉरंटचं बुकिंग स्विगी डाइनआउटद्वारे केल्याचं सांगत त्यांनी स्विगीलाही पोस्टमध्ये टॅग केलं आहे.
FSSAIचा तक्रार नोंदवण्याचा सल्ला
या पोस्टची दखल घेत FSSAIच्या अधिकृत सपोर्ट हँडलने Food Safety Connect अॅपवर संबंधित माहिती आणि तपशीलांसह औपचारिक तक्रार नोंदवण्याचा सल्ला दिला. मात्र, या, प्रकरणी आउलेटची अधिकृत तपासणी झाली आहे का किंवा कोणती कारवाई करण्यात आली आहे, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ आणि ग्राहकाने केलेले दावे स्वतंत्रपणे पडताळलेले नाहीत. संबंधित बार्बेक्यू नेशन आउटलेटच्या बाजूनेही अद्याप कोणतीही सार्वजनिक प्रतिक्रिया समोर आलेली नाही.