मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी मुंबईकर मतदारांना निवडणूक केंद्रांवर व्यवस्था आणि सोयीसुविधांचा सुखद अनुभव मिळावा यासाठी मुंबईतील निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीचा अनुभव लक्षात घेता मतदारांची कोणतीही गैरसोय होऊ नये, त्यांना रांगांमध्ये ताटकळत उभे राहावे लागू नये, याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी पुन्हा संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
मतदान केंद्रांवर रांगांच्या व्यवस्थापनासोबत पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह, स्वच्छता इत्यादी सुविधांचे नियोजन करण्याच्या सूचना काटेकोरपणे देण्यात आल्या आहेत.
लोकशाही प्रक्रियेत मत नोंदवणाऱ्या मतदारांना मतदान केंद्राच्या ठिकाणी सुखद अनुभव येईल, याअनुषंगाने सुविधा सज्ज ठेवण्याचे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी गगराणी यांनी संपूर्ण यंत्रणेला दिले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अतिशय सूक्ष्म आणि काटेकोरपणे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती निवडणुकीच्या तयारीशी संबंधित अधिकाऱ्याने दिली. मतदारांना मतदानाच्या दिवशी चांगला अनुभव यावा, यासाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी निश्चित किमान सुविधा, रांग व्यवस्थापन, प्रसाधनगृह व्यवस्था आदी सुविधांची पूर्ण अंमलबजावणी करण्याचे निर्देश गगराणी यांनी दिले आहेत.
मतदानाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भायखळा येथील वीरमाता जीजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयातील पेंग्विन सभागृहात बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी गगराणी होते.
अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी (मुंबई शहर) संजय यादव, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी (मुंबई उपनगरे) राजेंद्र क्षीरसागर यांच्यासह बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सर्व उपायुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त, सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मतदारांसाठी प्रतीक्षा कक्ष
मतदान केंद्रांच्या ठिकाणी रांगांचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रतीक्षा कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. याठिकाणी पंखा किंवा कुलर तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रत्येक ठिकाणी प्रसाधनगृहाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. ही प्रसाधनगृहे मतदानाच्या आधीच्या दिवशी तसेच मतदानाच्या दिवशी स्वच्छ रहावीत, यासाठी महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने नेटके नियोजन करण्याचे निर्देशही यावेळी गगराणी यांनी दिले. मतदारांची गैरसोय होऊ नये यासाठी निश्चित किमान सुविधा उपलब्ध होतील, याची खातरजमा करण्याच्या सूचनाही त्यांनी यंत्रणेला दिल्या.
गृहनिर्माण संस्थांमध्ये प्रथमच मतदान केंद्रे
अनेक मतदारसंघात गृहनिर्माण संस्थांच्या ठिकाणी मतदान केंद्रे उभारण्याचा प्रयोग पहिल्यांदाच बृहमुंबई महानगरपालिका क्षेत्रात राबविण्यात येत आहे.
अशा मतदान केंद्रांचे पोहचरस्ते आणि तेथील प्रसाधनगृहांची व्यवस्था याबाबतची खातरजमा करण्याच्या सूचनाही गगराणी यांनी दिल्या आहेत.
स्वयंसेवकांची मदत
दिव्यांग मित्र आणि दिव्यांग समन्वयक तसेच रांग व्यवस्थापनासाठी स्वयंसेवक म्हणून राष्ट्रसेवा दल (एनएसएस), राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) यांचे मतदानाच्या दिवशी सहकार्य लाभणार आहे.
या स्वयंसेवकांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यात यावे, असे आवाहन गगराणी यांनी अधिकाऱ्यांना केले आहे.