मुंबई : सिग्नल, रेल्वे रूळ, ओव्हरहेड उपकरणांची देखभाल आणि अभियांत्रिकी कामांसाठी पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी रात्री चार तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर ब्लॉक नसेल, तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेली नीट प्रवेश पूर्व परीक्षा रविवारी घेण्यात येणार असल्याने मध्य रेल्वेने मुख्य आणि हार्बर मार्गावरील ब्लॉक रद्द केला आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावर मुंबई सेन्ट्रल आणि माहिम स्टेशन दरम्यान जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. मुंबई सेंट्रल आणि माहीम स्टेशन दरम्यान शनिवार, ३ मे रोजी रात्री १२.१५ ते सकाळी ४.१५ पर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गांवर चार तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत, सांताक्रुझ आणि चर्चगेट स्टेशन दरम्यान सर्व जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गांवर चालवल्या जातील. रात्रकालीन ब्लॉकमुळे रविवार, ४ मे रोजी पश्चिम रेल्वे उपनगरीय विभागात दिवसभर ब्लॉक राहणार नाही.