मुंबई

ओलामधील ५०० कर्मचाऱ्यांची कपात होणार ?

वृत्तसंस्था

जगभरातील मंदीच्या भीतीने अनेक कंपन्यांमध्ये टाळेबंदीच्या बातम्या येत आहेत. भारतातही बायजू, अनॲकॅडमीसारख्या कंपन्यांमधील कर्मचारी कपात होण्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर टॅक्सी सेवा प्रदाता ओला ४०० ते ५०० कर्मचाऱ्यांची कपात करण्याची योजना आखत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ओलाला त्यांच्या आयपीओ योजनांमध्ये विलंब आणि निधी आव्हानांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत कंपनी आपला खर्च कमी करण्याच्या प्रयत्नात कर्मचाऱ्यांना कमी करण्याचे पाऊल उचलू शकते.

ओलामधील कर्मचारी कपातीची भीती वाढली आहे कारण कंपनीने नुकताच कंपनीचा क्विक कॉमर्स व्यवसाय ओला डॅश बंद केला आहे. त्याच वेळी, आपल्या इलेक्ट्रिक वाहनांच्या सेगमेंटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कंपनीने आपला सेकंड हँड कार व्यवसाय ओला कार्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपन्या बंद करण्यामागचा उद्देश कंपनीच्या इलेक्ट्रिक सेगमेंटच्या व्यवसायाला गती देण्याचा असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

कंपनीच्या जवळच्या सूत्रानुसार, प्रमुख व्यवस्थापकांना त्यांच्या टीममधील लोकांची यादी तयार करण्यास सांगितले आहे, ज्यांना कामावरून कमी केले जाऊ शकते. असेही वृत्त आहे की ओलाने देशाबाहेर यूके, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड सारख्या परदेशी बाजारपेठांमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय तूर्तास स्थगित केला आहे.

कंपनीशी संबंधित इतर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कंपनीने आंतरराष्ट्रीय बाजारात आपला खर्च जवळपास थांबवला आहे. यूके आणि न्यूझीलंडसारख्या देशांमध्ये, कंपनीचा बाजार हिस्सा आता एकल अंकांवर आला आहे.

अंदाजानुसार, ओलाच्‍या कोअर मोबिलिटी बिझनेसमध्‍ये सुमारे १ हजार ते ११०० कर्मचारी काम करतात. त्यांच्याकडून दर महिन्याला सुमारे १०० ते १५० कोटींचा महसूल मिळत असल्याचे सूत्रांनी सांगितले. ज्यामध्ये कंपनीला सुमारे ४० ते ५० कोटींचा नफा आहे. अशा परिस्थितीत ओला डॅशसारखा महागडा व्यवसाय बंद केल्याने कंपनीला आयपीओची तयारी करण्यास मदत होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

कर्मचाऱ्यांची कपात करण्याच्या निर्णयामुळे कंपनीचे ऑपरेटिंग मार्जिन वाढेल, त्यामुळे ते त्यांचा मूळ व्यवसाय नफ्यात दाखवू शकतील. तथापि, ओलामधील टाळेबंदीच्या वृत्तावर कंपनीकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. राईड-हेलिंग, ऑटो रिटेल, वित्तीय सेवा किंवा इलेक्ट्रिक वाहनांचा व्यवसाय असो, मोबिलिटी उद्योगावर आपले लक्ष केंद्रित राहील, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला अटक

महिंद्राच्या 'या' नवीन SUV ची जबरदस्त क्रेझ! अवघ्या 1 तासात 50,000 हून अधिक गाड्यांचे बुकिंग! पाहा फीचर्स अन् किंमत

ठाकरे गटाचा पाठिंबा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही! ‘एनडीए’ला बहुमत मिळणार; देवेंद्र फडणवीस यांना विश्वास

धक्कादायक! दहा वर्षाच्या चिमुकल्याचा गळा चिरून मृतदेह खाडीत फेकला, हत्येप्रकरणी वडिलांच्या मित्राला अटक

वांद्रे ते मरीन ड्राईव्ह फक्त १२ मिनिटांत! २.५ हजार मेट्रिक टन वजनाचा गर्डर लाँच