मुंबई : वरळी हिट अँड रन प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी पक्षपातीपणा व निष्काळजीपणा केला असल्याचा आरोप करून आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता १०३ अंतर्गत नोंद करावी व अतिरिक्त आरोपपत्र दाखल करावे, अशी मागणी करणाऱ्या याचिकेची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने पोलिसांना नोटीस बजावत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. या याचिकेमुळे आरोपी मिहीर शहा याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
मिहीरने ७ जुलैला दारूच्या नशेत बेदरकारपणे बीएमडब्ल्यू कार चालवली आणि वरळी परिसरात नाखवा दाम्पत्याला जोरदार धडक दिली. त्यात कावेरी नाखवा (४५) या महिलेचा मृत्यू झाला. मिहीरने गाडीखाली चिरडलेल्या कावेरी यांना निर्दयीपणे वांद्रे-वरळी सागरी सेतूपर्यंत फरफटत नेले होते. या घटनेनंतर फरार मिहीरला ९ जुलैला विरारच्या रिसॉर्टमधून पोलिसांनी अटक केली. प्रमुख आरोपी मिहीर शहा हा शिवसेना (एकनाथ शिंद) नेत्याचा मुलगा आहे. पोलिसांनी मिहीर शहाविरोधात भारतीय न्याय संहितेच्या १०३ कलमांतर्गत आरोपपत्रात दाखल करण्याची विनंती नाखवा कुटुंबीयांकडून पत्राद्वारे केली. मात्र राज्य सरकारकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने नाखवा यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. त्यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. दिलीप सटाळे यांनी या प्रकरणी अनेक पुरावे असतानाही आरोपींना पाठीशी घातले जात आहे. आरोपी विरोधात हत्येचे आरोप लावण्यात तपास अधिकारी अयशस्वी ठरले. यातून तपासातील निष्काळजीपणा किंवा पक्षपातीपणा दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांना तसे निर्देश द्यावेत, अशी विनंती केली. खंडपीठाने पोलिसांना याप्रकरणी नोटीस बजावत याचिकेची सुनावणी पुढील आठवड्यापर्यंत तहकूब केली.