बिजापूर : सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत छत्तीसगडमध्ये १२ नक्षलवादी ठार झाले आहेत, असे पोलिसांनी सांगितले.
बिजापूर आणि तेलंगणाच्या सीमेवर सुरक्षा दल व नक्षलवाद्यांमध्ये गुरुवारी चकमक झाली. यात १२ नक्षलवादी ठार झाले. सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरोधात आपली कारवाई अधिक तीव्र केली आहे. बिजापूरच्या मारुढबाका व पुजारी कांकेर भागात सकाळी ९ वाजल्यापासून ही चकमक सुरू आहे. या भागात नक्षलवादी उपस्थित असल्याची माहिती मिळताच डीआरजी बिजापूर, डीआरजी सुकमा, डीआरजी दंतेवाडा, कोबरा आदींनी कारवाई सुरू केली.
दोन कमांडो जखमी
दरम्यान, गुरुवारी बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात सीआरपीएफच्या कोब्रा कमांडो पथकातील दोन कमांडो जखमी झाले.
पोलिसांनी सांगितले की, ही घटना बासागुडा ठाणे क्षेत्रात घडली. सुरक्षा दलांचे संयुक्त पथक गस्तीसाठी या क्षेत्रात निघाले होते. यात सीआरपीएफची २२९ वी बटालियन व सीआरपीएफच्या कोब्रा बटालियनमधील जवान सामील होते. हे जवान चुकीने आयईडीच्या संपर्कात आले. त्यामुळे त्याचा स्फोट झाला. यात दोन जण जखमी झाले.