बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्म १xBet प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यानुसार मोठी कारवाई केली आहे. माजी क्रिकेटपटू शिखर धवन आणि सुरेश रैना यांच्या मालमत्तांवर एकूण ११.१४ कोटी रुपयांची जप्ती करण्यात आली आहे. ED ने दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये सुरेश रैनाच्या ६.६४ कोटी रुपयांच्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा समावेश आहे, तर शिखर धवनच्या नावावरील ४.५ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
बेकायदेशीर बेटिंग नेटवर्क
१xBet हा परदेशातून चालणारा ऑफशोअर बेटिंग प्लॅटफॉर्म आहे. भारतात ऑनलाइन जुगार आणि सट्टेबाजी बेकायदेशीर असल्याने याविरोधात आधीच विविध राज्यांमध्ये गुन्हे नोंदवले गेले आहेत. तपासात १xBet प्लॅटफॉर्मने १xBat आणि १xBat Sporting Lines यांसारख्या पर्यायी ब्रँड नावांचा वापर करून भारतीय वापरकर्त्यांना लक्ष्य केल्याचेही समोर आले.
ED च्या म्हणण्यानुसार, शिखर धवन आणि सुरेश रैना यांनी परदेशस्थित संस्थांसोबत जाहिरात आणि प्रमोशन करार केले होते. या जाहिरातींसाठीचे मानधन विविध परदेशी खात्यांमार्फत पाठवण्यात आले. ज्यामुळे निधीचा मूळ स्रोत लपवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे. या रकमा बेकायदेशीर बेटिंगमधून मिळणाऱ्या नफ्याशी संबंधित असल्याचा संशय ED ला आहे.
६,००० पेक्षा जास्त बोगस खाती
ED ने केलेल्या तपासानुसार, केवळ क्रिकेटविश्वातीलच नव्हे तर भारतातील अन्य वापरकर्त्यांकडून मिळणारा पैसा गोळा करण्यासाठी ६,००० हून अधिक बोगस बँक खाती तयार करण्यात आली होती. या खात्यांमधील व्यवहार पेमेंट गेटवे आणि परदेशी ट्रान्सफर मार्गांद्वारे फिरवले जात होते, ज्यामुळे पैसे नेमके कुठून येत होते हे समजणे कठीण होत होते. व्यवहाराच्या नोंदींमध्येही मोठ्या विसंगती दिसून आल्या आहेत. तपासात १००० कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या मनी लाँडरिंगचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
आत्तापर्यंत ईडीने ६० हून अधिक बँक खाती गोठवली आहेत आणि सुमारे ४ कोटींची रक्कम फ्रीज करण्यात आली आहे. पुढील तपासात निधीचा प्रवाह, अंतिम लाभार्थी आणि संबंधित संस्थांचे नेटवर्क यांचा शोध घेतला जात आहे.