चमोली : उत्तराखंडच्या चमोली येथे शुक्रवारी सकाळी ७.१५ वाजता हिमकडा कोसळून झालेल्या नैसर्गिक आपत्तीत ‘बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन’चे (बीआरओ) ५७ मजूर बर्फाखाली अडकले गेले होते. या घटनेनंतर लष्कर, आयटीबीपी, बीआरओ, एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या पथकाने तातडीने मदत व बचावकार्य सुरू केले. सायंकाळपर्यंत ३२ मजुरांना वाचवण्यात यश मिळाले असून २५ मजूरांचा शोध सुरू आहे. ४ मजुरांची प्रकृती गंभीर आहे.
बद्रीनाथपासून ३ किमीवरील चमोलीतील माणा गाव येथे ही दुर्घटना घडली. या भागात ‘बीआरओ’चा एक तळ आहे. त्यात ५७ मजूर होते. हे सर्व मजूर भारत-चीन सीमेवरील ‘सीमा रस्ते संघटने’च्या कामासाठी आले होते. हिमकडा कोसळल्यानंतर त्यात हे सर्व मजूर दबले गेले.
हे दुर्घटनास्थळ ३,२०० मीटर उंचीवर आहे. तेथे ६ फूट बर्फ जमलेला आहे. ही घटना घडली तेव्हा ८ कंटेनर व एका शेडमध्ये मजूर थांबले होते. वाचलेल्या सर्व मजुरांना माणा गावातील आयटीबीपीच्या तळावर आणले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, या भागातील वातावरण खराब झाल्याने बचावकार्य थांबवले आहे. सध्या या भागात जोरदार बर्फवृष्टी होत आहे.
या दुर्घटनेनंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ‘एसडीआरएफ’च्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री,
लष्कर, आयटीबीपी आणि एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून स्थितीचा आढावा घेतला. माणा हे तिबेट सीमेवरील भारताचे शेवटचे गाव आहे.
उत्तराखंड ‘एनडीआरएफ’चे पोलीस महानिरीक्षक रिधीम अग्रवाल यांनी सांगितले की, बद्रीनाथ धामजवळील माणा येथे हिमकडा कोसळला. आतापर्यंत ३७ मजुरांना वाचवण्यात यश मिळाले असून २५ जणांना शोध सुरू आहे.
बर्फवृष्टीमुळे अडथळे
बचाव पथकाची दुसरी टीम सहस्त्रधारा हेलिपॅडवर तयार ठेवली आहे. हवामान सुधारताच ‘एसडीआरएफ’च्या उंचावरील बचाव करणाऱ्या टीमला हेलिकॉप्टरने घटनास्थळी पाठवले जाईल. ‘एसडीआरएफ’ची ड्रोन टीमही तयार ठेवण्यात आली आहे.
लष्कराचे बचाव पथक तत्काळ सक्रीय
या दुर्घटनेची माहिती मिळताच भारतीय लष्कराचे बचाव पथक तत्काळ सक्रीय झाले. आयबेक्स ब्रिगेडच्या १०० जवान, डॉक्टर, रुग्णवाहिका, अवजड मशीनरी आदींनी बचावकार्य सुरू केले. सकाळी ११.५० वाजता बचाव पथकाने ५ कंटेनरांचा शोध घेतला. त्यातून ३७ मजुरांना बाहेर काढले. त्यातील चार जणांची प्रकृती गंभीर आहे. या भागात सातत्याने बर्फवृष्टी होत असल्याने बचावकार्य संथगतीने सुरू आहे.
सीमा रस्ते विभाग जोशीमठ व माणादरम्यानचा रस्ता मोकळा करण्यासाठी प्रयत्न करत आहे. तसेच जोशीमठहून अतिरिक्त वैद्यकीय मदत व सामग्री तत्काळ माणाला पाठवली जात आहे.
२४ तास बर्फवृष्टी
उत्तराखंडच्या अतिउंचीवरील भागात गेल्या २४ तासापासून बर्फवृष्टी होत आहे. तर सखल भागात पाऊस पडत आहे. केदारनाथ धाम, त्रियुगीनारायण, तुंगनाथ, चोपतासहित अन्य उंचावरील भागात बर्फवृष्टी होत आहे.