@ANI
राष्ट्रीय

राजस्थानमध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६८ टक्के मतदान ;विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-भाजपमध्ये चुरस

पुढील वर्षी लोकसभा निवडणुका असून त्यादृष्टीने राज्यातील सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपमध्ये निवडणुकीत मोठी रस्सीखेच आहे.

Rakesh Mali

जयपूर : राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी झालेल्या मतदानाच्या दिवशी काही तुरळक हिंसाचार वगळता सर्वत्र मतदान शांततेत पार पडले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकूण ६८ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त प्रवीण गुप्ता यांनी दिली. मतदानाची अंतिम टक्केवारी पूर्ण तपशील मिळाल्यानंतर देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

राजस्थानात २०१८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ७४.०६ टक्के इतके मतदान झाले होते. यावेळी हे मतदान ७५ टक्के होण्याची अपेक्षा निवडणूक आयोगाने व्यक्त केली होती. १९९ मतदारसंघांतील ५१००० इतक्या मतदान केंद्रांमध्ये सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली आणि सायंकाळी ६ वाजता मतदान संपले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाच्या आकडेवारीनुसार ६८.२ टक्के इतके मतदान झाले. जैसलमेर जिल्ह्यात सर्वात अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, तर त्याखालोखाल हनुमानगड आणि ढोलपूर या जिल्ह्यांचा क्रमांक लागला, असे गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पुढील वर्षी लोकसभा निवडणुका असून त्यादृष्टीने राज्यातील सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपमध्ये निवडणुकीत मोठी रस्सीखेच आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या दृष्टीने राजस्थानातील विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून पुन्हा सत्ता मिळविण्याचे लक्ष्य आहे.

शनिवारी मतदानाच्या दिवशी सुमारे १० टक्के मतदारांनी पहिल्या दोन तासांमध्ये मतदान केले, तर २५ टक्के मतदारांनी ११ वाजेपर्यंत मतदान केले. दुपारी एक वाजेपर्यंत ४० टक्क्यांपेक्षा अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. श्रीगंगानगर मतदारसंघामध्ये काँग्रेस उमेदवाराच्या मृत्यूमुळे तेथील मतदान पुढे ढकलण्यात आले आहे. तेथे आता ३ नोव्हेंबरला मतदान होणार आहे.

शनिवारी मतदानाच्या दिवशी सुमेरपूर मतदारसंघातील भाजप उमेदवार जोराराम कुमावत यांच्यासाठी काम करीत असलेले भाजपचे पोलिंग एजंट असलेले शांतीलाल यांचे निधन झाले, तर सत्येंद्र अरोरा या ६२ वर्षांच्या मतदाराचे हृदयविकाराच्या झटक्याने उदयपूर येथील पाली मतदान केंद्रात निधन झाले. १९९ विधानसभा जागांसाठी एकूण १८६२ इतके उमेदवार निवडणूक रिंगणात असून ५.२५ कोटींपेक्षा अधिक मतदार या निवडणुकीसाठी नोंदणीकृत आहेत.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश