नवी दिल्ली : देशात ८५ केंद्रीय, २८ नवोदय विद्यालय उघडण्यात येणार आहे. याबाबतच्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी मंजुरी दिली. ज्या जिल्ह्यात नवोदय विद्यालय नसतील, त्या जिल्ह्यात ही विद्यालये उघडली जातील. तसेच हरयाणा दरम्यान दळणवळण सुधारणासाठी दिल्ली मेट्रोच्या २६.४६ किमीच्या रिठाला ते कुंडली मार्गिकेला मंजुरी देण्यात आली.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, नवीन शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी ‘पीएम श्री’ आणण्यात आले. आता सर्व केंद्रीय व नवोदय विद्यालयांना ‘पीएम श्री’ स्कूलमध्ये नामांकित केले आहे. नवीन केंद्रीय विद्यालय उघडल्याने आणखी ८२ हजार विद्यार्थ्यांना स्वस्त व उच्च दर्जाचे शिक्षण मिळणार आहे. देशात सध्या १२५६ कार्यात्मक केंद्रीय विद्यालय आहेत. यातील तीन परदेशात आहे. मॉस्को, काठमांडू व तेहरान येथे आहे. सर्व केंद्रीय विद्यालयात १३.५६ लाख विद्यार्थी शिकत आहे.
केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, २०१४ पूर्वी २४८ किमी लांबीची मेट्रो होती. २०१४ ते २०२४ पर्यंत ७४५ किमी मेट्रोचे काम झाले. सध्या एक हजार किमी मेट्रोचे काम सुरू आहे. दिल्लीत चार टप्प्यात काम करण्याची योजना आहे. तीन टप्प्यात २९६ किमीचे काम झाले आहे. चौथ्या टप्प्यात सहा मार्गिका बनवल्या जातील. पाच मार्गिकांना यापूर्वीच मंजुरी दिली आहे. सहावी मार्गिका २६.४६२ किमी लांबीची असेल. त्यात २१ स्थानके असतील. सहाव्या मार्गिकेमुळे दिल्ली-हरयाणातील दळणवळण सुधारेल. ही मार्गिका रिठालाला सुरू होऊन नरेला-कुंडलीपर्यंत जाणार आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.