नवी दिल्ली : ‘क्यूएस’ विषयनिहाय रॅकिंगमध्ये नऊ भारतीय विद्यापीठे आणि संस्था ‘वर्ल्ड टॉप ५०’मध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाल्या आहेत. मात्र, या यादीत भारतातील तीन आयआयटी, दोन आयआयएम आणि ‘जेएनयू’ या प्रमुख संस्थांच्या क्रमवारीत घसरण झाली आहे.
लंडनस्थित ‘क्वाक्करेली सायमंड्स’ (क्यूएस) यांनी बुधवारी जाहीर केलेल्या १५व्या आवृत्तीच्या ‘वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग बाय सब्जेक्ट’नुसार, भारताने विषयवार क्रमवारी आणि व्यापक फॅकल्टी क्षेत्रांमध्ये ९ संस्थांनी ‘टॉप-५०’मध्ये स्थान मिळवले आहे.
भारतीय स्कूल ऑफ माइन्स (आयएसएम), धनबादने इंजिनिअरिंग-मिनरल आणि माइनिंगमध्ये २० वे स्थान मिळवले असून, हे भारताचे सर्वोत्तम प्रदर्शन करणारे विषय क्षेत्र ठरले आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) बॉम्बे आणि खरगपूर यांनी इंजिनिअरिंग-मिनरल आणि माइनिंगमध्ये अनुक्रमे २८वे आणि ४५वे स्थान मिळवले आहे. मात्र, दोन्ही संस्थांच्या क्रमवारीत यावेळी घट झाली आहे. आयआयटी दिल्ली आणि बॉम्बे यांनी यापूर्वी इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजीमध्ये ४५ वे स्थान संयुक्तपणे मिळवले होते, त्यांच्या स्थितीत सुधारणा होऊन त्यांना अनुक्रमे २६ वे आणि २८ वे स्थान मिळाले आहे. या दोन्ही संस्थांनी इंजिनिअरिंग-इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्समध्येही आपली क्रमवारी सुधारून ‘टॉप ५०’मध्ये स्थान मिळवले आहे.
भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) अहमदाबाद आणि बंगलोर या संस्था ‘बिझनेस अँड मॅनेजमेंट स्टडीज’साठी जागतिक टॉप ५० मध्ये कायम आहेत, पण त्यांची क्रमवारी मागील वर्षाच्या तुलनेत घसरली आहे. ‘आयआयएम, अहमदाबाद’चा क्रमांक २२ वरून २७ वर आला आहे, तर आयआयएम बंगलोरचा क्रमांक ३२ वरून ४० वर घसरला आहे.
आयआयटी मद्रास (पेट्रोलियम अभियांत्रिकी) आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) (डेव्हलपमेंट स्टडीज) हेही जागतिक टॉप ५० मध्ये कायम असले तरी त्यांच्या क्रमवारीत काही स्थानांची घसरण झाली आहे.