नवी दिल्ली : दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी एक मोठी दुर्घटना टळली. काबूलहून आलेल्या एरियाना अफगाण एअरलाईन्सच्या एका विमानाने एअर ट्रॅफिक कंट्रोलकडून परवानगी मिळालेल्या धावपट्टीऐवजी दुसऱ्याच धावपट्टीवर लँडिंग केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एटीसीने विमानाला धावपट्टी २९ एलवर उतरण्याची स्पष्ट परवानगी दिली होती, पण वैमानिकाने ते विमान उड्डाणासाठी वापरल्या जाणाऱ्या रनवे २९ आरवर उतरवले. सुदैवाने, त्यावेळी २९ आरवर कोणतेही विमान उड्डाणासाठी सज्ज नव्हते, त्यामुळे लँडिंग सुरक्षित झाले आणि मोठी दुर्घटना टळली.
या चुकीबद्दल वैमानिकाने आपली चूक मान्य करण्याऐवजी खराब हवामान आणि ‘आयएलएस सिस्टिम'ला दोष दिला आहे. वैमानिक दिशाभ्रमित झाला होता की तांत्रिक त्रुटी आली होती, याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या घटनेची गांभीर्याने दखल घेत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.