१ ऑक्टोबरपासून AC, TV महागणार; ५ ते ८ टक्क्यांनी महाग होण्याची शक्यता 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
राष्ट्रीय

१ ऑक्टोबरपासून AC, TV महागणार; ५ ते ८ टक्क्यांनी महाग होण्याची शक्यता

सणासुदीच्या काळात घरातील वापराच्या महत्त्वाच्या वस्तू खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो.

Swapnil S

मुंबई : सणासुदीच्या काळात घरातील वापराच्या महत्त्वाच्या वस्तू खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. मात्र आता नवरात्रौत्सव, दिवाळीच्या आधी आता एअर कंडिशनर (एसी), स्मार्ट एलईडी टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीनच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. १ ऑक्टोबरपासून या वस्तूंच्या किंमती ५ ते ८ टक्क्यांनी महागण्याची शक्यता आहे. अनेक कंपन्यांनी किंमती वाढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार आहे.

इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या किंमती अचानक वाढण्यामागे जागतिक स्तरावरील आर्थिक आणि राजकीय घडामोडी कारणीभूत आहेत. पश्चिम आशियातील वाढता युद्धजन्य तणाव आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चिततेमुळे तांबे, पोलाद, ॲल्युमिनियम आणि प्लास्टिक निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. या सर्व कच्च्या मालाचा वापर एसी, टीव्ही आणि फ्रिजच्या निर्मितीत मोठ्या प्रमाणावर केला जातो.कच्च्या मालाच्या वाढत्या दरांसोबतच आंतरराष्ट्रीय मालवाहतूक शुल्कात झालेली वाढ आणि रुपयाच्या तुलनेत परकीय चलनात होणारे चढ-उतार यामुळे कंपन्यांच्या नफ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे. हा आर्थिक भार सहन करणे कठीण झाल्याने कंपन्यांनी ही दरवाढ ग्राहकांवर लादण्याचा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ब्लू स्टार, गोदरेज अप्लायन्सेस, हायर, डायकिन आणि सुपर प्लास्ट्रॉनिक्ससह अनेक कंपन्यांनी आधीच काही उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत. एलजी आणि हिताची ब्रँडचे एअर कंडिशनर विकणाऱ्या बॉश होम कम्फर्टनेही एसीच्या दरात सुमारे पाच टक्क्यांनी वाढ केली आहे. पॅनासोनिक सध्या दरवाढीसंदर्भातील परिस्थितीचा आढावा घेत आहे. कच्च्या मालाच्या विक्रमी किमती आणि वाढत्या वाहतूक खर्चामुळे काही वस्तूंच्या किमती ५ ते ८ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात तांब्याची किंमत गेल्या वर्षीच्या सुमारे ८,०००-९,००० डॉलर प्रति टनावरून वाढून सुमारे १४,५०० डॉलर प्रति टन झाली आहे. एका सरासरी एसीसाठी ३ ते ४ किलोग्रॅम तांबे लागत असल्याने, उत्पादन खर्च थेट वाढला आहे.

१ ऑक्टोबरपासून नवीन दरपत्रक लागू

अनेक कंपन्या १ ऑक्टोबरपासून नवीन दरपत्रक लागू करणार आहेत, तर काही कंपन्या नोव्हेंबर महिन्यापासून हे बदल लागू करतील. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यातही पुन्हा एकदा किंमती वाढवाव्या लागतील, असा इशारा काही कंपन्यांनी दिला आहे. मात्र असे असले तरी बहुतांश डीलर्स, दुकानदार आणि वितरकांनी आधीच या वस्तूंचा साठा करून ठेवल्यामुळे दिवाळीपर्यंत ग्राहकांना जुन्याच किंमतीत वस्तू खरेदी करण्याची संधी मिळू शकते.

कोणत्या उपकरणाचे दर किती टक्क्यांनी वाढणार?

एसी आणि डीप फ्रीझर्स श्रेणीत ५ ते ८ टक्क्यांनी वाढ होणार आहे. वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर आणि एलईडी टीव्ही या उपकरणांच्या किंमती ३ ते ५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. सध्या ग्राहकांना मिळणाऱ्या जीएसटी सवलतींमुळे प्रत्यक्ष खरेदीवर या दरवाढीचा निव्वळ परिणाम सुमारे ५ टक्क्यांपर्यंतच जाणवेल, असा दावा काही तज्ज्ञांनी केला आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

एल निनो संकट तीव्र होणार; पुढील वर्षाचीही तयारी करावी लागेल, फडणवीसांचा इशारा

निवडणूक आयोगाच्या बचावासाठी सत्ताधारी सरसावले; एनडीएचा विरोधकांवर हल्लाबोल

मुंबईत पाणीकपात कायम; BMC चा निर्णय, धरणात ९७ टक्के पाणीसाठा

अशोकजी सिंघल : एक राष्ट्रऋषी

मराठवाड्याच्या पाचवीला पुजलेला दुष्काळ!