Tamil Nadu : अण्णाद्रमुकमध्ये फूट, एक गट मुख्यमंत्री विजय यांच्यासोबत 
राष्ट्रीय

Tamil Nadu : अण्णाद्रमुकमध्ये फूट, एक गट मुख्यमंत्री विजय यांच्यासोबत

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन नव्या सरकारचा शपथविधी पार पडल्यानंतर राज्यातील राजकारणात मंगळवारी मोठा भूकंप झाला.

Swapnil S

चेन्नई : तमिळनाडू विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन नव्या सरकारचा शपथविधी पार पडल्यानंतर राज्यातील राजकारणात मंगळवारी मोठा भूकंप झाला. अण्णा द्रमुकचे प्रमुख एडप्पाडी के. पलानीस्वामी यांच्याविरोधात आमदारांच्या एका मोठ्या गटाने बंड पुकारल्याने पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर उभा आहे. या बंडखोर आमदारांनी पलानीस्वामींवर कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या 'द्रमुक'शी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला असून, उद्या बुधवारी होणाऱ्या बहुमत चाचणीपूर्वी विजय यांच्या 'तमिळगा वेत्री कळघम' (टीव्हीके) सरकारला पाठिंबा जाहीर केला आहे.

ज्येष्ठ नेते एस.पी. वेलुमणी आणि सी.व्ही. षण्मुगम यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ३० आमदारांनी बंडाचे निशाण फडकवले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला १६४ पैकी केवळ ४७ जागा मिळाल्याने पलानीस्वामींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. षण्मुगम यांनी माध्यमांना सांगितले की, आम्ही सी. जोसेफ विजय यांची भेट घेऊन त्यांना पाठिंब्याचे पत्र देणार आहोत. पलानीस्वामी यांना द्रमुकच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करायचे होते, जो आमच्या पक्षाच्या मूळ तत्त्वांचा अपमान आहे. एम.जी. रामचंद्रन यांनी द्रमुकला विरोध करण्यासाठीच हा पक्ष स्थापन केला होता.

बंडखोर नेत्यांच्या मते, पक्षाला आता "नवे चैतन्य" हवे असून जयललिता (अम्मा) यांच्या काळातील सुशासन परत आणण्यासाठी विजय यांच्या पक्षाला पाठिंबा देणे आवश्यक आहे. दुसरीकडे, पलानीस्वामी गटाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ज्या नेत्यांना स्वतःच्या जिल्ह्यात पक्षाला विजय मिळवून देता आला नाही, ते आता खोट्या अफवा पसरवत आहेत, असे प्रत्युत्तर पक्षाने दिले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये पक्षाने दावा केला की, वेलुमणी आणि षण्मुगम हे केवळ मंत्रीपदासाठी हा खटाटोप करत आहेत.

द्रमुकचे संघटक सचिव आर.एस. भारती यांनी पलानीस्वामींसोबतच्या कोणत्याही गुप्त युतीचे वृत्त फेटाळून लावले आहे. आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करू हे स्टालिन यांनी आधीच स्पष्ट केले आहे, असे त्यांनी सांगितले. थोल थिरुमावलवन यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. ते म्हणाले की, टीव्हीकेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी द्रमुक आणि अण्णा द्रमुक या दोन्ही पक्षांनी मला मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती, जी आम्ही फेटाळून लावली.

बुधवारी होणाऱ्या बहुमत चाचणीमध्ये या ३० आमदारांच्या भूमिकेमुळे तामिळनाडूच्या राजकारणाला कोणती नवीन दिशा मिळते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. अण्णा द्रमुकमधील हा कलह १९८७ (एमजीआर यांच्या निधनानंतर) आणि २०१६ (जयललिता यांच्या निधनानंतर) झालेल्या सत्तासंघर्षाच्या आठवणी ताज्या करत आहे.

Mumbai Rain Alert : मुंबईत मुसळधार पावसासह भरतीचाही धोका; वादळी वाऱ्याचा इशारा, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

कर्जमाफीची अंतिम यादी लवकरच; प्राप्तिकर भरणाऱ्यांची माहिती मिळाल्यानंतरच यादी प्रसिद्ध होणार, पहिल्या टप्प्यात २५ लाख शेतकऱ्यांची नावे

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शाही खानपान; खानपानावर प्रत्येक वर्षी ९ कोटी ८५ लाख रुपयांचा खर्च

Navi Mumbai : कर्तव्य संपले... पण माणुसकी नाही; रबाळे वाहतूक पोलिसांच्या प्रसंगावधानाने बेशुद्ध कारचालकाला जीवदान

ठाण्यातील अग्निसुरक्षा धाब्यावर; शहरातील आकडेवारीने प्रशासनाची झोप उडाली