राष्ट्रीय

इराणी विमानात बॉम्बच्या भीतीने हवाई दलाची धावपळ

वृत्तसंस्था

चीनला जाणाऱ्या एका इराणी विमानात भारताच्या हवाई हद्दीतून जात असताना बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाल्याने एकच खळबळ उडाली. या इराणी विमानाने दिल्लीत तातडीच्या लँडिंगसाठी परवानगी मागितली. परंतु, भारत सरकारने दिल्लीत लँडिगला परवानगी नाकारली व या विमानास जयपूर किंवा चंदिगढला उतरण्याची सूचना केली. मात्र, वैमानिकाने विमान अन्यत्र वळवण्यास नकार दिल्याने भारतीय हवाई दलाची सुखोई लढाऊ विमाने हवेत झेपावली व त्यांनी या विमानावर लक्ष ठेवत या विमानाला भारतीय हद्दीबाहेर सोडले.

या विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळताच हवाई दलाची सुखोई लढाऊ विमाने या विमानावर लक्ष ठेवण्यासाठी तैनात करण्यात आली. या लढाऊ विमानांनी पंजाब आणि जोधपूर एअरबेसवरून उड्डाण केले. लढाऊ विमानांनी इराणी विमानाला एस्कॉर्ट करीत भारतीय सीमेबाहेर सोडले. इराणचे हे विमान भारतीय हवाई हद्दीतून नंतर म्यानमार आणि चीनच्या दिशेने गेले. या विमानाने चीनमधील ग्वांगझू येथे सुरक्षित लँडिंग केल्याचे व या विमानात बॉम्ब असल्याची माहिती ही अफवाच असल्याचे नंतर स्पष्ट झाले.

दिल्ली ‘एटीसी’ला लाहोर ‘एटीसी’कडून इराणच्या महान एअरच्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाली. यानंतर दिल्ली एटीसीने इराणी वैमानिकाला ही माहिती दिली असता त्याने दिल्लीत लँडिंगची परवानगी मागितली. मात्र, ही परवानगी नाकारण्यात आली व वैमानिकाला जयपूर किंवा चंदिगढचा पर्याय लँडिंगसाठी देण्यात आला. मात्र, वैमानिकाने विमान वळवण्यास नकार देत उड्डाण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला.फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट ‘फ्लाइटरडार’च्या मते, महान एअरचे हे विमान इराणमधील तेहरानहून चीनमधील ग्वांगझूला जात आहे. सकाळी ९.२० वाजता बॉम्बच्या धमकीबाबत फोन आला होता. दिल्ली विमानतळावरील अधिकाऱ्यांना याबाबत तत्काळ सतर्क करण्यात आले, परंतु तांत्रिक कारणांमुळे तेथे लँडिंगला परवानगी नाकारण्यात आली.

निवडणुकीनंतरही संघर्षमय राजकारण

ऑनलाईन गेमची उलाढाल

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला अटक

महिंद्राच्या 'या' नवीन SUV ची जबरदस्त क्रेझ! अवघ्या 1 तासात 50,000 हून अधिक गाड्यांचे बुकिंग! पाहा फीचर्स अन् किंमत

ठाकरे गटाचा पाठिंबा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही! ‘एनडीए’ला बहुमत मिळणार; देवेंद्र फडणवीस यांना विश्वास