नवी दिल्ली : एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसमधील सर्व वैमानिकांची अमली पदार्थांच्या सेवनाबद्दलची चाचणी घेण्यात येणार आहे. टाटा समूहाच्या मालकीच्या या दोन्ही विमान कंपन्यांमध्ये मिळून ५,००० हून अधिक वैमानिक आहेत. गेल्या आठवड्यात फुकेत-दिल्ली विमान अचानक ३०० फूट खाली येण्याच्या घटनेनंतरच्या चौकशीत संबंधित वैमानिकाने गांजा घेतल्याचे निष्पन्न झाले होते. त्या पार्श्वभूमीवर ही चाचणी केली जाणार आहे.
दोन्ही कंपन्यांनी वैमानिकांना याबाबत संदेश पाठवला आहे. ही चाचणी अनिवार्य असून गुरुवारपासूनच सुरू करण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.
सर्व वैमानिकांना तपासणी अनिवार्य
एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसने आपल्या सर्व वैमानिकांना याबाबत संदेश पाठवला आहे. १३ ऑगस्टपासून ही तपासणी सुरू करण्यात येणार असून ती अनिवार्य असेल, अशी माहिती देण्यात आली आहे. गुरुग्राम येथील प्रशिक्षण अकादमीमध्ये प्रशिक्षणादरम्यान, तसेच उड्डाणानंतर फ्लाइट ब्रीफिंग सेंटर, एअर इंडिया कार्यालय किंवा संबंधित बेसने निश्चित केलेल्या ठिकाणी ही तपासणी केली जाणार आहे.
एअर इंडियाचे फ्लाइट ऑपरेशन्स प्रमुख मनीष उप्पल यांनी समूहातील वैमानिकांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये, परवानगी नसलेले पदार्थ किंवा औषधांचे सेवन केले आहे का, हे तपासण्यासाठी सर्व वैमानिकांची तपासणी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
फुकेत-दिल्ली विमान अचानक ३०० फूट खाली
४ ऑगस्ट रोजी एअर इंडियाच्या AI2379 या एअरबस A320neo विमानासोबत ही घटना घडली. फुकेतहून दिल्लीला येत असताना विमानाची उंची अचानक सुमारे ३०० फूटांनी कमी झाली होती. या घटनेचा तपास विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) करत आहे.
या घटनेनंतर विमानाच्या प्रमुख वैमानिकाची गांजासाठी प्राथमिक चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर करण्यात आलेल्या दुसऱ्या खात्रीशीर चाचणीतही हा निकाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे.
वैमानिकांनी तयार केलेल्या प्राथमिक तांत्रिक बिघाड अहवालात घटनेपूर्वी विमानात काही तांत्रिक समस्या निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामध्ये ऑटोपायलट प्रणाली बंद पडल्याचाही समावेश आहे. त्यामुळे या घटनेमागे नेमके कारण काय होते, याचा तपास सुरू आहे.
सरकारही नियम कडक करण्याच्या तयारीत
या घटनेनंतर केंद्र सरकारकडूनही विमान वाहतूक क्षेत्रातील अमली पदार्थ चाचणीचे नियम आणखी कडक करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) सायकोॲक्टिव्ह पदार्थांच्या तपासणीसंदर्भातील सध्याच्या नियमांचा आढावा घेण्याची शक्यता आहे. यामध्ये अचानक करण्यात येणाऱ्या चाचण्यांचे प्रमाण वाढवणे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची तरतूद करण्याचा विचार होऊ शकतो.
सध्या १० टक्के कर्मचाऱ्यांची अचानक चाचणी
जानेवारी २०२२ पासून लागू असलेल्या सध्याच्या नियमांनुसार, नियोजित व्यावसायिक विमान कंपन्या, हवाई वाहतूक नियंत्रक, विमान प्रशिक्षण संस्था आणि हवाई दिशादर्शन सेवा पुरवठादारांना दरवर्षी किमान १० टक्के कर्मचाऱ्यांची अचानक अमली पदार्थ चाचणी करणे आवश्यक आहे.
प्राथमिक तपासणीत चाचणी पॉझिटिव्ह आल्यास संबंधित कर्मचाऱ्याला सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील जबाबदाऱ्यांपासून दूर करण्याची तरतूदही आहे.
चाचणी अनिवार्य
भारतात वैमानिकांसाठी उड्डाणापूर्वी आणि उड्डाणानंतर मद्यसेवनाची तपासणी करण्यासाठी ब्रेथ ॲनालायझर चाचणी अनिवार्य आहे. आता अमली पदार्थांच्या तपासणीबाबतही याच धर्तीवर अधिक कठोर आणि नियमित व्यवस्था करण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.