कोची : कोचीहून अबू धाबीला जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या IX 415 या बोईंग ७३७ विमानाला उड्डाणाच्या मध्यावरूनच माघारी फिरावे लागले. विमानाच्या डाव्या बाजूच्या इंजिन क्रमांक १ मधील तेलाचे प्रमाण वेगाने कमी होत असल्याचे वैमानिकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर तेलाचा दाब धोकादायक पातळीवर गेल्याने खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित इंजिन बंद करण्यात आले. अखेर विमानाने कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षित लँडिंग केले.
३६ हजार फूट उंचीवर बिघाडाची चाहूल
माहितीनुसार, उड्डाणानंतर सुमारे ५० मिनिटांनी ३६ हजार फूट उंचीवर असताना इंजिन क्रमांक १ मधील तेलाचे प्रमाण सातत्याने कमी होत असल्याचे वैमानिकांच्या लक्षात आले. परिस्थितीचे मूल्यांकन केल्यानंतर तेलाची पातळी आणखी घसरत असल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर, अबू धाबीच्या दिशेने पुढे जाण्याऐवजी विमान कोचीला परत आणण्याचा निर्णय घेण्यात आला. कमांडरने हाय फ्रिक्वेन्सीवर मुंबई रेडिओशी संपर्क साधत विमान माघारी वळवत असल्याची माहिती एअर ट्रॅफिक कंट्रोलला दिली.
४५ मिनिटांनी ऑईल प्रेशर 'रेड झोन'मध्ये
विमान कोचीच्या दिशेने परतल्यानंतरही दोन्ही वैमानिकांनी इंजिनशी संबंधित सर्व मापदंडांवर बारकाईने लक्ष ठेवले. सुमारे ४५ मिनिटांनी इंजिन क्रमांक १ मधील तेलाच्या दाबात चढ-उतार सुरू झाले आणि कॉकपिटमधील मापकावरील ऑईल प्रेशर रेड झोनमध्ये पोहोचले.
तेलदाब धोकादायक पातळीवर गेल्यानंतर क्रूने नॉन-नॉर्मल चेकलिस्टनुसार प्रक्रिया पूर्ण करत इंजिन क्रमांक १ बंद केले. त्यानंतर उर्वरित इंजिनच्या मदतीने विमानाचा प्रवास सुरू ठेवण्यात आला.
प्रवाशांना गंभीर परिस्थितीची कल्पनाच नाही
एका इंजिनवर आणि तुलनेने अधिक वजन असलेल्या बोईंग ७३७ विमानाचे लँडिंग करणे ही वैमानिकांसाठी अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती मानली जाते. मात्र, क्रूने सर्व मानक सुरक्षा प्रक्रियांचे पालन करत विमान कोचीन विमानतळावर सुरक्षितपणे उतरवले.
विमान सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
भारतीय विमान कंपन्यांच्या विमानांना तांत्रिक कारणांमुळे मार्ग बदलावा लागण्याच्या किंवा माघारी फिरावे लागण्याच्या घटना अलीकडच्या काळात वारंवार समोर येत आहेत. त्यामुळे विमान कंपन्यांच्या तांत्रिक देखभालीसह सुरक्षा देखरेखीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.
एअर इंडिया फुकेत-दिल्ली विमानाच्या घटनेवरील विमान अपघात तपास ब्युरोच्या प्राथमिक निष्कर्षांनंतर काही दिवसांतच ही घटना समोर आली आहे. त्या प्रकरणात संबंधित विमानाची तांत्रिक तपासणी करण्यात आली होती आणि पुढील विश्लेषणासाठी हायड्रॉलिक घटक व नमुने गोळा करण्यात आले होते.
DGCA च्या सुरक्षा ऑडिटकडे लक्ष
फुकेत-दिल्ली घटनेनंतर केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी विमान कर्मचाऱ्यांसाठी सायकोॲक्टिव्ह पदार्थांच्या वार्षिक चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याबाबत माहिती दिली होती.
आता एअर इंडिया एक्स्प्रेसच्या इंजिनमधील ऑईल प्रेशरच्या या घटनेनंतर नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि DGCA विमान कंपन्यांच्या सुरक्षा ऑडिटची चौकट आणखी कठोर करणार का? हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनकडून (FAA) International Aviation Safety Assessment (IASA) कार्यक्रमांतर्गत देशाच्या विमान सुरक्षा देखरेख व्यवस्थेचे वेळोवेळी मूल्यांकन केले जाते. भारताचे याआधीचे मोठे IASA मूल्यांकन ऑक्टोबर २०२१ मध्ये झाले होते. पुढील ऑडिट नोव्हेंबरमध्ये अपेक्षित असल्याने या पार्श्वभूमीवर भारताच्या विमान सुरक्षा व्यवस्थेकडे विशेष लक्ष लागले आहे.
Air India Express कडून स्पष्टीकरण
दरम्यान, एअर इंडिया एक्स्प्रेसच्या प्रवक्त्यांनी या घटनेबाबत स्पष्टीकरण दिले आहे. "सुमारे आठवडाभरापूर्वी आमच्या कोची-अबुधाबी विमानाने प्रस्थापित सुरक्षा प्रोटोकॉलनुसार हवेतूनच परतीचे (Air Turnback) उड्डाण केले होते. त्यानंतर प्रवाशांना पर्यायी विमानाद्वारे अबुधाबीला पाठवण्यात आले. या घटनेची वेळ आणि संबंधित पार्श्वभूमी न देता केले जाणारे वृत्तांकन प्रवासी आणि विमानातील पाहुण्यांमध्ये अनावश्यक चिंता निर्माण करू शकते," असे एअर इंडिया एक्स्प्रेसच्या प्रवक्त्यांनी सांगितले.