अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी CID कडे; अपघातस्थळी प्रवेश बंद; स्वतंत्र तपास सुरू 
राष्ट्रीय

अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी CID कडे; अपघातस्थळी प्रवेश बंद; स्वतंत्र तपास सुरू

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नुकतेच बारामती विमानतळ परिसरात विमान कोसळून दुर्दैवी निधन झाले. या गंभीर प्रकरणात राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन अपघाताची चौकशी सीआयडी (क्राइम इन्क्वायरी डिव्हिजन) मार्फत करण्याचे आदेश दिले आहेत.

Swapnil S

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नुकतेच बारामती विमानतळ परिसरात विमान कोसळून दुर्दैवी निधन झाले. या गंभीर प्रकरणात राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन अपघाताची चौकशी सीआयडी (क्राइम इन्क्वायरी डिव्हिजन) मार्फत करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, अपघातस्थळी कोणालाही प्रवेश न देण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित यंत्रणांना जारी करण्यात आले आहेत.

या घटनेबाबत बारामती पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सीआयडीकडे वर्गित करण्यात आला आहे. माहितीनुसार, २८ जानेवारी रोजी मुंबई विमानतळावरून ‘लिअरजेट’ या आठ आसनी विमानाने अजित पवार हे बारामती येथील जिल्हा परिषद प्रचार सभांसाठी रवाना झाले होते. मात्र, लँडिंगपूर्वी विमान कोसळल्याच्या दुर्दैवी अपघातात त्यांच्यासह एकूण पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

सुरुवातीच्या चर्चेत अपघात कमी दृश्यमानता आणि रनवेवर उतरताना पायलटच्या अंदाज चुकल्यामुळे झाल्याची शक्यता यथास्थळी व्यक्त होत आहे; परंतु विमानातील तांत्रिक बिघाड किंवा घातपात यासारख्या शक्य कारणांवरही संशय व्यक्त केला जात असल्याने सीआयडीने सर्व शक्य परिस्थितींचा सखोल तपास करण्याचा निर्णय घेतला आहे.

सीआयडीकडे अॅक्सिडेंटल डेथ रिपोर्ट (एडीआर) ताब्यात घेतला असून, घटनास्थळी प्रत्यक्ष तपासणी करून तज्ज्ञांच्या मदतीने गहन चौकशी केली जाणार आहे. याआधीच, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (एएआयबी) कडूनही या अपघाताचा स्वतंत्र तपास सुरू आहे.

तपासाची कागदपत्रे वर्ग

कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास राज्य सरकारच्या आदेशानुसार सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. सीआयडीचे पोलीस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ हे तपास प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. पुणे ग्रामीण पोलीस विभागाकडून या प्रकरणाशी संबंधित सर्व तपासातील कागदपत्रे सीआयडीकडे सुपूर्द करण्यात आली आहेत. या प्रकरणातील तपास अद्याप सुरू असून सीआयडी आणि एएआयबीच्या संयुक्त प्रयत्नातून अपघाताचे खरे कारण लवकरात लवकर शोधून यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सुनेत्रा पवार आज घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ; ठरणार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

मुंबई महापौरपदाचा पेच सुटला; 'या' नावांची चर्चा; महापौर, स्थायी समितीसह अन्य समित्यांबाबतही ठरले

ठाणे महापौरपदासाठी शिंदेसेनेच्या शर्मिला पिंपळोलकरांचा अर्ज; भाजपची भूमिका झाली मवाळ

KDMC मध्ये शिवसेनेचा महापौर, तर उपमहापौरपद भाजपकडे; शिवसेनेच्या हर्षाली चौधरी, भाजपच्या राहुल दामलेंचा उमेदवारी अर्ज दाखल

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे दाखल