राष्ट्रीय

मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम; Akasa Air च्या वेळापत्रकात बदल, जेद्दाहसाठी उड्डाणे सुरू तर काही शहरांतील सेवा बंद

Akasa Air च्या निवेदनानुसार, ३१ मार्च २०२६ पर्यंत जेद्दाहला जाणारी आणि येणारी काही उड्डाणे सुरू राहतील. ही उड्डाणे मुंबई, अहमदाबाद, बंगळुरू, कोची आणि...

किशोरी घायवट-उबाळे

मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अकासा एअर (Akasa Air) ने मंगळवारी (दि.१०) प्रवाशांसाठी महत्त्वाचे ट्रॅव्हल अपडेट जाहीर केले आहे. सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर काही निवडक आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, काही मार्गांवरील सेवा तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर दिलेल्या माहितीनुसार, विमान कंपनीने सुरक्षेचा सखोल आढावा घेतल्यानंतर जेद्दाह (Jeddah) मार्गावर मर्यादित सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

जेद्दाहसाठी निवडक उड्डाणे सुरू

अकासा एअर (Akasa Air) च्या निवेदनानुसार, ३१ मार्च २०२६ पर्यंत जेद्दाहला जाणारी आणि येणारी काही उड्डाणे सुरू राहतील. ही उड्डाणे मुंबई, अहमदाबाद, बंगळुरू, कोची आणि कोझिकोड या प्रमुख भारतीय शहरांशी जोडली जाणार आहेत.

प्रादेशिक सुरक्षा परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असून, त्यामुळे प्रवाशांना प्रवासाचे नियोजन करण्यास मदत होईल, असे विमान कंपनीने स्पष्ट केले. मात्र, मध्यपूर्वेतील परिस्थितीनुसार उड्डाण वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता असल्याचेही सांगण्यात आले आहे.

काही शहरांसाठी उड्डाणे स्थगित

दरम्यान, रियाध (Riyadh) येथील उड्डाणे ११ मार्चपर्यंत स्थगित ठेवण्यात आली आहेत. तसेच अबू धाबी, दोहा आणि कुवैत सिटी या शहरांसाठीची उड्डाणे १५ मार्चपर्यंत तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हा निर्णय घेतल्याचे कंपनीने सांगितले.

तिकीट रद्द किंवा बदलण्यासाठी विशेष सवलत

या परिस्थितीमुळे प्रभावित झालेल्या प्रवाशांसाठी Akasa Air ने विशेष सवलत योजना (Waiver Policy) लागू केली आहे. संबंधित शहरांसाठी बुकिंग केलेल्या प्रवाशांना ३१ मार्चपर्यंत कोणतेही अतिरिक्त शुल्क न भरता तिकीट रद्द करण्याची किंवा प्रवासाची तारीख बदलण्याची सुविधा देण्यात आली आहे.

तिकीट रद्द केल्यास रिफंड मिळणार

तिकीट रद्द केल्यास प्रवाशांना पूर्ण रक्कम सात दिवसांच्या आत मूळ पेमेंट पद्धतीवर परत केली जाईल, असे कंपनीने सांगितले आहे. ज्या प्रवाशांनी ट्रॅव्हल एजंटमार्फत बुकिंग केले आहे, त्यांनी तिकीट बदल किंवा रद्द करण्यासाठी संबंधित एजंटशी संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले आहे.

प्रवाशांना उड्डाण स्थिती तपासण्याचा सल्ला

अकासा एअरने प्रवाशांना विमानतळावर जाण्यापूर्वी उड्डाणाची स्थिती (Flight Status) तपासण्याचा सल्ला दिला आहे. प्रवासी कंपनीच्या अधिकृत वेबसाइट किंवा मोबाईल अ‍ॅपद्वारे अपडेट्स घेऊ शकतात.

मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे अनेक विमान कंपन्या उड्डाणांचे वेळापत्रक पुन्हा तपासत असून त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय प्रवासावर होत आहे.

"प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे," असे अकासा एअरने निवेदनात म्हटले असून या काळात प्रवाशांनी दाखवलेल्या संयमाबद्दल कंपनीने आभार मानले आहेत.

प्रल्हाद जोशी नवे केंद्रीय शिक्षणमंत्री; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर स्वीकारला पदभार

Mumbai : शिवाजी पार्कवर तरुणाईचा महासागर! ठाकरे बंधूंच्या विजय जल्लोष सभेला हजारोंची उपस्थिती; VIDEO

'ही केवळ सुरुवात, अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे'; अभिजीत दिपकेंचा नवा व्हिडीओ चर्चेत

Mumbai Property Tax : मालमत्ता कराचे बिल आता थेट व्हॉट्सअ‍ॅपवर; BMC ची नवी डिजिटल सेवा लवकरच सुरू

वाशिममध्ये मध्यरात्री भीषण आग! काही मिनिटांत चार दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी, VIDEO