गाझियाबाद : पश्चिम उत्तर प्रदेशातून बदलाचे वारे वाहत असून इंडिया आघाडी गाझियाबादपासून गाझीपूरपर्यंत निवडणुकीत नि:संशय यश प्राप्त करील, असा विश्वास सपाचे नेते अखिलेश यादव यांनी बुधवारी येथे व्यक्त केला.
आपल्या मतांची विभागणी होऊ नये याची मतदारांनीच काळजी घ्यावी आणि भाजपचा सफाया करण्यासाठी आपल्या बुथचे रक्षण करावे, असे आवाहनही यादव यांनी केले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासमवेत एका संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उत्तर प्रदेशात निवडणुकीचा पहिला टप्पा सुरू होत आहे, उत्तर प्रदेशच्या पश्चिमेकडून बदलाचे वारे वाहू लागले आहेत ते संपूर्ण उत्तर प्रदेशातील आणि देशातील वातावरण बदलून टाकतील. सध्या देशातील शेतकरी निराश झाला आहे, भाजपने दिलेली आश्वासने खोटी असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नाही किंवा युवकांना बेरोजगार मिळला नाही, भाजपच्या नैतिकतेचा फुगा फुटला आहे. निवडणूक रोखे प्रकरणाने भाजपचे सत्य उजेडात आले आहे, भाजप भ्रष्टाचाराचे गोदाम बनला आहे, असेही यादव म्हणाले.
भाजपने दुहेरी इंजिनाचा दावा केला आहे, त्यांच्या पोस्टर्सकडे पाहा, त्यावरून उमेदवारच गायब आहे आणि केवळ एकच व्यक्ती दिसत आहे, निवडणुकीनंतर पोस्टर्सवरील सध्याचा चेहराही गायब झालेला दिसेल, खोटे बोलून लूट करा ही त्यांची एकमेव घोषणा राहिली आहे, असेही यादव म्हणाले.