(संग्रहित छायाचित्र)
राष्ट्रीय

१०० आमदार आणा, सरकार बनवा! उत्तर प्रदेश भाजपमध्ये धुसफुस; अखिलेश यांची ‘मान्सून ऑफर’

उत्तर प्रदेश भाजपमध्ये अंतर्गत धुसफुस सुरू झाल्याची अटकळ बांधली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर सपाचे नेते अखिलेश यादव यांनी गुरुवारी राज्यातील सत्तारूढ पक्षासाठी 'एक्स'वर एक 'मान्सून ऑफर' दिल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

Swapnil S

लखनऊ : उत्तर प्रदेश भाजपमध्ये अंतर्गत धुसफुस सुरू झाल्याची अटकळ बांधली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर सपाचे नेते अखिलेश यादव यांनी गुरुवारी राज्यातील सत्तारूढ पक्षासाठी 'एक्स'वर एक 'मान्सून ऑफर' दिल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

‘मान्सून ऑफर-१०० आमदार घेऊन या, सरकार स्थापन करा’, असे अखिलेश यादव यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे. यादव यांनी या पोस्टमध्ये कोणाचाही नामोल्लेख केला नसला तरी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जे नाराज आहेत आणि ज्यांची पक्षांतर करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठीच ही पोस्ट असल्याचे सपातीलच एका ज्येष्ठ नेत्याचे म्हणणे आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत २०२२ मध्ये सपाचे १११ उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपच्या १०० असंतुष्ट आमदारांचा आम्हाला जर पाठिंबा मिळाला तर आम्ही राज्यात सहज सरकार स्थापन करू शकतो, असेही सपाचा हा नेता म्हणाला. सरकारपेक्षा पक्ष मोठा आहे, अशी पोस्ट उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी ‘एक्स’वर टाकल्यानंतर भाजपमध्ये अंतर्गत धुसफुस सुरू झाल्याची अटकळ बांधण्यात येऊ लागली. सर्व मंत्री, आमदार आणि लोकप्रतिनिधी यांनी पक्ष कार्यकर्त्यांचा आदर केला पाहिजे, असे मौर्य यांनी म्हटले आहे.

मौर्य यांनी मंगळवारी दिल्लीत पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली, मात्र भाजप अथवा मौर्य यांच्याकडून या भेटीबाबत काहीही सांगण्यात आले नाही. आदित्यनाथ आणि मौर्य यांच्यात सख्य नसल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. भाजपचे काही नेते खासगीत बोलताना आदित्यनाथ यांच्या कार्यशैलीवर उघड टीका करीत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीतील कामगिरीवरही त्यामुळेच परिणाम झाल्याचेही बोलले जाते.

लक्ष्मीपूजनाला वरुणराजाचे 'फटाके'! दिवाळीच्या धामधुमीत मुंबई, ठाणे, नवी मुंबईत अवकाळी पावसाचे धुमशान

दिवाळीच्या सणात पावसाची आतषबाजी; शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान

दिवाळीनिमित्त मोदींचे देशवासीयांना पत्र; स्वदेशी, भाषा, आरोग्य यासह ऑपरेशन सिंदूरचाही केला उल्लेख

राज ठाकरेंच्या दीपोत्सवावर सरकारची जाहिरातबाजी; मनसेची संतप्त पोस्ट, म्हणाले, "आमच्या पक्षाला...

MMR २०४७ पर्यंत बनणार अग्रगण्य शहरी अर्थव्यवस्था; MMRDA चा विश्वास