जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी दोन हात करताना वीरमरण आलेले शहीद जवान अमजद अली खान यांना बुधवारी शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. मात्र या अंत्यसंस्कारावेळी घडलेला एक हृदयद्रावक प्रसंग पाहून उपस्थित प्रत्येकाचा काळजाचा ठोका चुकला.
शहीद जवानाचं पार्थिव जेव्हा त्यांच्या घरी आणलं, तेव्हा त्यांची अवघ्या दीड वर्षांची मुलगी वडिलांना अखेरचा निरोप देण्यासाठी तिथे पोहोचली. शवपेटीत ठेवलेले वडिलांचे पार्थिव पाहताच तिने त्यांना ओळखलं आणि बोबड्या आवाजात ‘पापा… पापा…’ अशी हाक मारत राहिली. मात्र कितीही हाक मारली, तरी आपले वडील आता कधीच उठणार नाहीत, याची जाणीव त्या चिमुकलीला नव्हती. तिला वाटले आपले वडील जसे रोज कामावरून येतात, थकतात आणि झोपतात तसेच यावेळी झोपले असतील .. आपण आवाज दिल्यावर ते उठतील.. तिला उचलून घेतील.. तिचे लाड करतील.. पण कसले काय. दहशतवाद्यांसमोर काळ बनून उभा राहणारा हा जवान आज त्याच्या लाडक्या लेकीच्या हाकेला प्रतिसाद न देता निपचित पडून होता...
शवपेटीजवळ उभी राहून वडिलांना उठवण्याचा प्रयत्न
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दिसतं की, अमजद अली खान यांचे पार्थिव शवपेटीत ठेवलेले आहे. मुलगी तिकडे जाताच वडिलांना स्पर्श करते, त्यांच्या चेहऱ्याकडे पाहते आणि गळा दाटून आलेल्या आवाजात ‘पापा… पापा…’ म्हणत त्यांना उठवण्याचा प्रयत्न करते. या प्रसंगामुळे उपस्थित सर्वच गहिवरले होते. शहीद जवानाच्या मुलीचे वडिलांवरील निरागस प्रेम आणि त्यांची अखेरची भेट पाहून प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू तरळले. या भावनिक क्षणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, पाहणाऱ्यांचे मन हेलावून टाकत आहे.
दहशतवादविरोधी कारवाईत शहीद
मिळालेल्या माहितीनुसार, शहीद जवान अमजद अली खान हे जम्मू-काश्मीरच्या उधमपूर येथे दहशतवाद्यांविरोधातील एका मोहिमेत शहीद झाले. देशाच्या सुरक्षेसाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या या सर्वोच्च बलिदानाबद्दल संपूर्ण देशातून आदरांजली वाहिली जात आहे.
व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी सोशल मीडियावर हळहळ व्यक्त करीत आहेत.