'फी भरली नाही' म्हणून मित्र-मैत्रिणींसमोर अपमान; १७ वर्षीय विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल, मृत्यूपूर्वीचा Video व्हायरल, शिक्षकांविरोधात गुन्हा 
राष्ट्रीय

'फी भरली नाही' म्हणून मित्र-मैत्रिणींसमोर अपमान; १७ वर्षीय विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल, मृत्यूपूर्वीचा Video व्हायरल, शिक्षकांविरोधात गुन्हा

अमृतसरमध्ये शालेय फीच्या थकबाकीवरून मानसिक छळ झाल्याचा आरोप करत १७ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली. मृत्यूपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्याध्यापिका आणि शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mayuri Gawade

शालेय फीच्या थकबाकीमुळे होत असलेल्या कथित मानसिक छळाला कंटाळून १७ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पंजाबमधील अमृतसर येथे घडली आहे. या प्रकरणानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका आणि एका शिक्षिकेविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास सुरू आहे.

मृत विद्यार्थिनीची ओळख अमजोत कौर औलख अशी झाली आहे. ती फतेहगड चुरियन येथील डिसिप्लिन्ड डिसायपल इंटरनॅशनल स्कूलमध्ये बारावीमध्ये शिक्षण घेत होती. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, २२ मे रोजी अमजोतने विषारी पदार्थाचे सेवन केले होते. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

मृत्यूपूर्वी रेकॉर्ड केला व्हिडिओ

मृत्यूपूर्वी अमजोत कौरने रुग्णालयातून एक व्हिडिओ संदेश रेकॉर्ड केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात तिने शाळेकडून होत असलेल्या कथित त्रासाबाबत उल्लेख केला असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

कुटुंबीयांचे गंभीर आरोप

माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, अमजोतच्या कुटुंबीयांनी शाळा प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. सुमारे २० हजार रुपयांची फी थकीत असल्याने विद्यार्थिनीवर सातत्याने दबाव टाकला जात होता, असा त्यांचा दावा आहे.

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, फीच्या कारणावरून तिला वारंवार सुनावले जात होते. काहीवेळा इतर विद्यार्थ्यांसमोर तिचा अपमान करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ती गेल्या काही महिन्यांपासून मानसिक तणावाखाली होती, असे नातेवाईकांनी सांगितले.

प्रमाणपत्र रोखल्याचाही दावा

कुटुंबीयांनी आणखी काही गंभीर आरोप केले आहेत. अमजोतने याच शाळेतून अकरावीचे शिक्षण पूर्ण केले होते. मात्र शाळा प्रशासनाने तिचे दहावीचे प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तसेच अभ्यासाव्यतिरिक्त काही खासगी कामे करण्यास भाग पाडले जात होते, असा त्यांचा दावा आहे.

हे काम करण्यास नकार दिल्यास कमी गुण देणे, नापास करणे किंवा शैक्षणिक नुकसान करण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे. मात्र या आरोपांवर शाळा प्रशासनाची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.

प्राचार्या आणि शिक्षिकेविरोधात एफआयआर

पोलिसांनी कुटुंबीयांच्या जबाब आणि प्राथमिक तपासाच्या आधारे शाळेच्या मुख्याध्यापिका शबनम शर्मा आणि वर्गशिक्षिका आकांक्षा शर्मा यांच्याविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

सरकारची दखल

या घटनेची पंजाब सरकारनेही गंभीर दखल घेतली आहे. शिक्षणमंत्री हरजोत सिंह बैन्स यांनी सांगितले की, विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.

दरम्यान, शवविच्छेदन अहवाल आणि तपासाचा अंतिम निष्कर्ष समोर आल्यानंतरच मृत्यूमागील संपूर्ण सत्य स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे शाळांमधील विद्यार्थ्यांवरील मानसिक दबाव आणि फी वसुलीच्या पद्धतींबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Mumbai : चार हॉटेल्सवर एफडीएची कारवाई; कॅफे मोंडेगर, महाराष्ट्र बिर्याणी सेंटरचे परवाने निलंबित

साखर कारखान्यांना ७३८ कोटींचे व्याज अनुदान; सहकारी साखर कारखान्यांसाठी सुलभ कर्ज योजना, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

Mumbai : शंख-शिंपल्यांपासून साकारली ९.५ फुटांची इको-फ्रेंडली गणेशमूर्ती; मालाडच्या श्री साई दर्शन मित्रमंडळाचे १७ व्या वर्षात पदार्पण

Pune : जल्लोषपूर्ण वातावरणात भाऊ रंगारी गणपती बाप्पा विराजमान; पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते विधिवत प्राणप्रतिष्ठापना

अधिष्ठाताच करणार पुनरावलोकन; कामकाजाच्या पुनरावलोकनासाठी वेगळी पद्धत, मुंबई महापालिकेचा नवा निर्णय