पाटणा : बिहारमधील सत्ताधारी जनता दलाने आमदार अनंत सिंह आणि त्यांच्या पत्नी, माजी आमदार नीलम देवी यांची कथित पक्षविरोधी कारवायांमुळे शनिवारी सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली.
पक्षाचे बिहार प्रदेशाध्यक्ष उमेश सिंह कुशवाह यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पक्षाच्या निर्देशांचे उल्लंघन करणे, पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाविरोधात अपमानास्पद भाषा वापरणे आणि नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत प्रतिस्पर्धी पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करणे, या कारणांमुळे अनंत सिंह यांचे प्राथमिक सदस्यत्व तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात आले आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीतून राजकारणात आलेल्या अनंत सिंह यांनी जनसुराज पक्षाचे उमेदवार अनुज सिंह यांचा बिहार विधान परिषद निवडणुकीत प्रचार सुरू केल्याने जेडीयूविरोधात उघड भूमिका घेतली होती.
जेडीयूचे विधान परिषद सदस्य नीरज कुमार यांचा पराभव करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला होता. यासाठी त्यांनी अनुज सिंह यांना पाठिंबा देत त्यांच्या बाजूने प्रचारही केला होता. दरम्यान, संविधानातील भारतीय दहाव्या अनुसूचीनुसार अनंत सिंह यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस जेडीयूने बिहार विधानसभेच्या अध्यक्षांकडे केली आहे.
पक्षविरोधी कारवायांमध्ये कथित सहभाग असल्याच्या कारणावरून अनंत सिंह यांच्या पत्नी आणि माजी आमदार नीलम देवी यांचेही प्राथमिक सदस्यत्व तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. शनिवारीच अनंत सिंह यांनी विधान परिषद निवडणुकीत अनुज सिंह यांच्या विजयाबद्दल विश्वास व्यक्त केला. २७ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होण्यापूर्वीच त्यांच्या पाटणा येथील निवासस्थानी मिठाई आणि इतर खाद्यपदार्थ तयार केले जात होते.