आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशातील डॉ. बी. आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यात मंगळवारी (दि. १७) पहाटे ओएनजीसीच्या (ONGC) गॅस विहिरीतून मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली. विहिरीत पुन्हा खोदकाम सुरू असताना ही घटना घडली. सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने घटनास्थळापासून एक किलोमीटरच्या परिसरातील जवळपास ८०० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले असून, गॅसगळती रोखण्यासाठी ओएनजीसीकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
माहितीनुसार, गेड्डाडा गावाजवळील गॅस विहिरीत पहाटे सुमारे ४.३० वाजण्याच्या सुमारास ही गळती सुरू झाली. विहिरीत पुन्हा खोदकाम आणि दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक मोठा आवाज झाला. त्यानंतर विहिरीतून मोठ्या वेगाने वायू बाहेर पडू लागला. घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन पथके आणि जिल्हा प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅसगळती झालेल्या ठिकाणी आग लागली नसून विहिरीच्या वरच्या भागातील यंत्रणाही सुरक्षित आहे. मात्र, गळती रोखण्यासाठी ओएनजीसीच्या पथकांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. विहीर बंद करण्यासाठी सिमेंटिंगचे काम करणारे विशेष पथकही घटनास्थळी रवाना करण्यात आले आहे.
४०० ते ५०० घरांमधील नागरिकांचे स्थलांतर
सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने गॅसगळती झालेल्या ठिकाणापासून एक किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित केला आहे. या भागातील सुमारे ४०० ते ५०० घरांमधील जवळपास ८०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. स्थलांतरित नागरिकांच्या राहण्याची तसेच दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाची व्यवस्था जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी महेश कुमार रविराला यांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. विजेवर चालणारी उपकरणे, दिवे आणि गॅस शेगड्यांचा वापर करू नये, अशा सूचना परिसरातील नागरिकांना देण्यात आल्या आहेत. गळती झालेला वायू आडव्या दिशेने पसरण्याऐवजी सरळ वरच्या दिशेने हवेत जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ओएनजीसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विहिरीभोवती पाण्याचे संरक्षक आवरण तयार करण्यात आले आहे. यासाठी सतत पाण्याचे फवारे मारले जात आहेत. घटनास्थळाजवळील डिझेल जनरेटर आणि इतर उपकरणे बंद करून सुरक्षित अंतरावर हलवण्यात आली आहेत. अग्निशमन दलालाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २१६ वरील बायपास मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. वायूचा अनियंत्रित प्रवाह रोखण्यासाठी नरसापूरम येथून विशेष पथक नगरम गावाकडे रवाना झाले आहे. पुढील काही तासांत गळती नियंत्रणात आणण्यात यश येईल, असा विश्वास ओएनजीसीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
चंद्राबाबू नायडू यांच्याकडून परिस्थितीचा आढावा
या घटनेची माहिती मिळताच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. तसेच बाधित भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासह ओएनजीसीच्या तांत्रिक पथकांशी समन्वय साधण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
कोनसीमा जिल्ह्यात अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली. ओएनजीसीचे अध्यक्ष आणि वरिष्ठ व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. याशिवाय, सध्या लागू असलेल्या सुरक्षा नियमांचा आणि उपाययोजनांचा सर्वंकष आढावा घेण्यास सांगितले आहे.
दरम्यान, यंदा कोनसीमा जिल्ह्यात ओएनजीसीच्या गॅस विहिरीतून गळती होण्याची ही किमान चौथी घटना असल्याचे वृत्त आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात मोरी गावातील गॅस विहिरीतून अनियंत्रितपणे वायू बाहेर पडल्याने आग लागली होती. ही आग जवळपास पाच दिवस धुमसत होती. त्यामुळे सध्याच्या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.